जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील प्रेमी युगलाने पसार होतांना मुलीच्या घरातील तब्बल २० तोळे सोने आणि ८० हजार रुपये रोख सोबत नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमी युगुलासह पाच जणांवर अपहरणासह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील एक तरुणी दि.२५ रोजी दुपारी घरातून निघून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी त्यांच्या घराशेजारील महिलेने मुलीच्या आईला याबाबत माहिती देत ज्या कारमध्ये युवती बसली त्यात चार युवक होते, असे सांगितले. या घटनेनंतर मुलीच्या आईने घरात तपासणी केली, यावेळी त्यांना ३ लाख २० हजार रुपयांच्या प्रत्येकी ४ तोळ्यांच्या दोन पोत, तसेच चार चार तोळ्यांचे ३ लाख २० हजार रुपयांचे दोन हार, साडे तीन तोळ्यांच्या एक लाख ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या साखळ्या आणि रोकड असा १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
१८ फेब्रुवारी २०२१ रोजी संशयित युवक युवतीची छेड काढत होता. त्यावेळी तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र, युवकाच्या आई-वडिलांनी विनंती केली होती. तसेच १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर पुन्हा नाव घेणार नाही व पाठलाग करणार नाही, असे लिहून दिले होते. त्यामुळे आता त्याच युवकाने युवतीचे अपहरण केल्याची खात्री झाल्याने, मुलीच्या आईने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पाच जणांवर अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.