जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । कसण्यासाठी दिलेल्या शेतीचे पैसे घ्यायला आल्याने शेतकरी व त्याच्या पत्नीला, पाच जणांनी लाठ्या काठयांनी मारहाण केल्याची घटना, २३ रोजी दुपारी दोन वाजता पिळोदा येथे घडली. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील तिघांसह पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला.
रमेश सोनू निकुंभ यांनी आपली शेती गोकुळ भिवंसन धोबी (रा.गांधली) याला ६० हजारात कसण्यासाठी दिली होती. माल विकल्यानंतर पैसे देण्याचे ठरले होते. २२ रोजी रमेश निकुंभ पैसे मागायला गेले असता गोकुळ धोबी यांनी पैसे देण्यास नकार दिला. २३ रोजी दुपारी रमेश निकुंभ व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई घरी असताना, एक चारचाकी (क्र.एम.एच.१८-डब्ल्यू.६९६५) क्रमांकाची दाराशी उभी राहिली. त्यातून गोकुळ धोबी, रवी दिगराळे, विकी दिगराळे, राहुल पाटील (रा. चिलाने, ता.शिंदखेडा) व राजेश अभय उदेवाल (रा.अमळनेर) हे उतरले. त्यांनी निकुंभ दांपत्याला मारहाण व शिविगाळ केली. भांडण सोडवल्यानंतर पती-पत्नी घरात दार लावून बसले असताना, संशयितांनी पुन्हा दार ठोठावून धमकी दिली. पुन्हा पैसे मागितल्यास गुंड लावून मारहाण करू, अशी धमकी दिली. याप्रकरणी रमेश निकुंभ दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला.