जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावमधील पाच कृषी परवानेधारकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्याचे समोर आलेले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार या पाचही कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे सांगतिले जात आहे

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील भरारी पथक प्रमुख पद्मनाभ मस्के, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे, तालुका गुणवत्ता निरीक्षक ज्योती कड्डू यांच्या पथकाने डमी ग्राहकाच्या मदतीने या पाच कृषी केंद्रांमधील व्यवहारांची पडताळणी केली होती. त्यात तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने या पथकाने कारवाईचे अस्त्र हाती घेतले आहे.

पथकाला काय आढळले?
१) युरिया असतानाही खते देण्यास होत होती टाळाटाळ
२) बनावट ग्राहकांच्या माध्यमातून चढ्या दरांची झाली खात्री
३) कृत्रिम टंचाई निर्माण करून आर्थिक लूट करण्याचे प्रकार
४) काही दुकानांमध्ये गंभीर अनियमितता
आज होणार सुनावणी
या कारवाईनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी चाळीसगावला भेट दिली. या भेटीत त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून समजत आहे. तसेच गंभीर पुरावे उपलब्ध असल्याने या केंद्रचालकांवर परवाने निलंबनासह अन्य कारवाई करण्याचे सुतोवाच सुत्रांनी दिले.








