‘ते’ आगीचे गोळे म्हणजे न्यूझीलंडच्या इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचे तुकडे
जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । जळगाव शहरासह राज्यात आणि देशात शनिवारी रात्री ७.३० ते ७.५० च्या दरम्यान आकाशात उल्कावर्षाव सारखे दृश्य पाहण्यास मिळाले. नागरिकांच्या मनात त्यावरून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, आकाशात दिसलेले ते दृश्य म्हणजे न्यूझीलंडच्या माहीया द्वीपकल्पावरुन इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या ब्लॅकस्काय नावाच्या उपग्रहाच्या बूस्टरचे तुकडे असल्याची माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच तुकडे असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना निश्चितच नाही असे त्यांनी स्पष्ट केले. खगोलशास्त्र तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्याने नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर झाले आहे.
दरम्यान, चंद्रपूर तालुक्यातील एका गावात उपग्रहाच्या बूस्टरचे अवशेष पडल्याची माहिती समोर येत आहे.