जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट केली जात असून व्यापाऱ्यांच्या या मनमानी व एकाधिकारशाहीवर बाजार समित्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांची व्यापारी वर्गाकडुन होणारी पिळवणुक थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी व सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यासह जिल्हाभरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचा माल हा बोर्ड भावापेक्षा कमी भावाने कापणी केला असून व्यापाऱ्याच्या मनमानी व एकाधिकारशाहीवर अंकुश नसलेल्या बाजार समितीच्या नाकर्तेपणा विरोधात शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापारी हा नेहमी बोर्ड भावापेक्षा ५०० ते ६०० रूपयांनी कमी भाव देतो. यामुळे शेतकरी बांधवाला खुप मोठा आर्थिक फटका बसत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही शेतकरी बांधवांसह राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसत आहोत. दुष्काळामुळे शेतकरी अधिकच संकटात आहे, अशाही परिस्थितीत शेतकरी बांधव काळ्या मातीत कष्टाने केळी बाग जगवत आहे. त्यात निसर्गाची भर म्हणुन वादळी पावसाने केळीचा घात केला. या सर्व प्रकारावर जळगाव बाजार समिती कुंभकर्णाची झोपेचे सोंग घेत आहे. अनेक खरेदीदारांकडे परवाने नाहीत, यात फसवणुक शेतकऱ्यांची होत आहे. बाजार समित्या जे दर जाहीर करतात, त्या दरात केळी खरेदी केली जात नाही. झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ न बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधी कोरोनामुळे आता अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार झाला आहे, मात्र केळीच्या हमी भावासाठी कुणीच पुढाकार घेत नाही, अशाप्रकारे शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष कराल तर येणाऱ्या काळात हाच शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी यावेळी दिला.
नाहीतर तीव्र आंदोलन : प्रतिभा शिंदे यांचा इशारा
लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे उपोषण स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या. घटस्थापनेच्या दिवशी शेतकरी राजाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाव कमी दिला म्हणून कोणत्या व्यापाऱ्याला अटक होत नाही. त्यामुळे या विरोधात एल्गार पुकारण्यात येईल, असे सांगून शासनाने केळीला फळाचा दर्जा द्यावा, पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, शासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रतिभा शिंदे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी छोटु पाटील, चंद्रभान पवार, संजय बडगुजर, अशोक पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
केळी बोर्ड भावानुसार व रास/फरक सहीत खरेदी करावे. केळी उत्पादक शेतकरी बांधवांची व्यापारी वर्गाकडुन होणारी पिळवणुक थांबवावी. केळी व्यापारी हा परवाना धारकच पाहिजे, तसेच बाजार समितीने त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करावे. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहिर करावा व पंचनामे न करता सरसकट ५० हजार रूपये हेक्टरी अनुदान द्यावे, आदी मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.