…अखेर शिवाजीनगर पुलाच्या टी मार्गाच्या कामाला होणार सुरुवात!
जळगाव लाईव्ह न्युज । SHIVAJI NAGAR POOL । छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या टी आकाराच्या रस्त्याला येणारा अडथळा लवकरच दूर होणार असून अखेर या कामाला देखील सुरुवात होणार आहे.छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. मात्र ‘टी’ आकारासाठी महापालिकेने पुलापासून ते साळुंखे चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेतले नव्हते.यामुळे अडथळा येत होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाला पत्र देऊनही मनपा याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र शहर अभियंता एम जी गिरगावकर यांनी उड्डाण पुलापासून ते साळुंके चौकापर्यंत रस्त्याची पाहणी केली असून हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यावरील विद्युत खांब स्थलांतरित करण्यासाठी देखील ते महावितरण कंपनीशी बोलणार आहेत. गेल्या तीन वर्षापासून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी 24 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र अत्यंत संथ गतीने काम सुरू असल्यामुळे अद्यापही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. या कामांमध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे काम रेंगाळले आहे.
सध्या पुलाचे काम हे 70 ते 75 टक्के पर्यंतच पूर्ण झाले आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॉवर चौकापासून सरळ शिवाजीनगर साळुंखे चौकात उतरणाऱ्या आर्मचे काम अद्याप देखील सुरुवात झालेली नाही. या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे तिथे हे काम सुरू झाले नव्हते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाला अतिक्रमण काढण्याच्या विनंती करून देखील मनपा याकडे दुर्लक्ष करत होती. अखेर या ठिकाणचे अतिक्रमण मनपाने काढायची सूचना दिली आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल व अतिक्रमण निघेल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.