जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । एरंडोल नगरपालिका घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनातंर्गत शहरातून व घरा, घरांतून घंटागाड्यांद्वारे ओला व सुका या प्रमाणे वेगवेगळ्या पध्दतीने कचरा संकलन करण्यात येत आहे. या वर्गीकृत केलेला कचऱ्यापैकी ओल्या कचऱ्यापासून एरंडोल नगरपालिका पद्मालय रोड येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर खत निर्मिती करीत आहे.
तयार झालेल्या खताची एरंडोल न.पा ने महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी जि.अहमदनगर या प्रयोग शाळेतून चाचणी करून सदरील अहवाल महाराष्ट्र शासनास हरित ब्रॅण्ड प्राप्त करण्याकरिता सादर करण्यात आलेला होता. या खताची चाचणीची पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एरंडोल न.पा.च्या तयार करण्यात आलेल्या खतास हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्ड म्हणून दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. तयार करण्यात आलेले खत उत्तम दर्जाचे असून सदरील खत हे परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्प दराने उपलब्ध करून देण्यात आलेले असून खतास मोठया प्रमाणात मागणी वाढत आहे.
मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी माहिती दिली की, एरंडोल न.पा.ने तयार केलेले खत हे सेंद्रीय पध्दतीचे असून रासायनिक शेतीपासून होत असलेल्या निसर्गाच्या हानीस वाचविण्याचा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये सर्व न.पा. कर्मचारी व एरंडोल शहरातील सर्व नागरिकांचे अनमोल सहकार्य लाभलेले आहे.