जिथून डिस्चार्ज तिथेच गेला मृतदेह ; ट्रकच्या धडकेत मुलासमोर पिता ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२४ । डोळ्यांची शस्त्रक्रिया करून मुलासोबत दुचाकीने घरी जात असताना ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावर घडली. युसूफ शेख इस्माईल खाटीक (७८, रा. खाटीक गल्ली पारोळा) असं मृताचे नाव असून या अपघातात मुलगा अस्लम शेख युसूफ खाटीक (४४) हे जखमी झाले आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डोळे तपासणी करण्यासाठी आलेले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते रूग्णालयातच होते. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी त्यांची घरी जाण्यासाठी सुटका झाली होती. त्यामुळे अस्लम शेख युसुफ खाटीक त्यांचे वडील युसूफ शेख इस्माईल खाटीक यांच्यासोबत दुपारी १ वाजता ते दुचाकीने (क्र. एमएच १९, ईएफ ७५२४) घरी पारोळा येथे परत जात होते.
याच दरम्यान, शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. त्यावेळी मागे बसलेले त्यांचे वडील युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर नागरीकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून तसेच पोलीस कर्मचारी यांनी मृतदेहाचा पंचनामा करून खागसी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी दिसून आली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.