जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा सहकारी साखर कारखान्याने जळगाव तालुक्यातील नशिराबाद आणि बेळी परिसरातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला. मात्र चार पाच महिने उलटूनही अद्याप मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी आज जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. थकलेल्या ४० ते ५० लाख रुपयांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत न्यायची याचना केली आहे.

शेतकऱ्यांनी अनेकवेळा पैनगंगा कारखान्याच्या प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊनही आपल्या हक्काच्या पैशांची मागणी केली. मात्र, कारखाना प्रशासनाकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. टाळाटाळ आणि दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे. पेमेंट न मिळण्यास येत्या काळात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
8 जानेवारी 2025 पासून पैनगंगा साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नशिराबाद, बेळी आणि निमगाव शिवारातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. कंपनीने 20 दिवसांत पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत कोणतेही पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. कारखाना प्रशासनाकडून उडवाउडवीची भूमिका घेतली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या कंपनीचे चेअरमन व कृषी अधिकारी शेतकऱ्यांचे फोन देखील उचलत नसल्याची तक्रार आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तत्काळ थकीत पेमेंट झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल आणि त्यास संपूर्ण जबाबदार कारखाना प्रशासन असेल.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना याप्रसंगी राकेश विष्णू पाटील, प्रभाकर नामदेव नारखेडे, रामदास त्र्यंबक पाटील, माधुरी राकेश पाटील, प्रमोद दनू पाटील, शरद तुळशीराम चौधरी, प्रकाश नामदेव नारखेडे, हरी गोविंदा पाचपांडे, लिलाधर भानू नारखेडे, चंद्रकांत दगडू नारखेडे, स्वानील चंद्रकांत पाटील, ज्ञानदेव धांडे, नरेंद्र भंगाळे, प्रदीप नारखेडे, नामदेव महाजन, शरद राणे, प्रवीण राणे, सुभाष भोई आणि आदी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.