ऐन खरीपात खतांच्या टंचाईचे संकट? बियाण्यापुर्वीच शेतकऱ्यांकडून खतांचा शाेध सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । यंदा ऐन खरीपात खतांची टंचाई निर्माण हाेण्याची भीती असल्याने प्रथमच शेतकरी बियाण्यापुर्वी खतांसाठी शाेधाशाेध करीत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्याला ३ लाख टन खतांची गरज असून सध्या १ लाख टन खत उपलब्ध झाले आहे.
यंदा रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम खत आयातीवर होणार आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे आणि याच हंगामात अधिकच्या रासायनिक खतांची आवश्यकता असते. गरजेच्या तुलनेत अधिकचे खत हे रशियामधून आयात होत असते. याची सुरवात मे महिन्यापासून होते. मात्र, यंदा खत खरेदीचे सौदे होत असतानाच युध्दाला सुरवात झाली. त्यामुळे आयात झाले तरी त्याचे प्रमाण हे कमी असणार आहेत.
यंदा युरिया वगळता अन्य रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ हाेत आहे. पाेटॅशच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर अन्य मिश्र खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जागतीक बाजारातील टंचाईमुळे जिल्ह्याला मंजुर ३ लाख टनांचा काेटा उपलब्ध हाेण्यासाठी विलंब लागेल किंवा अडचणी येवू शकतात. सध्या जिल्ह्यात जवळपास १ लाख टन खतांची उपलब्धता आहे. यात सर्वाधिक युरिया ३३ हजार टन असून डीएपी १ हजार टन तर पाेटॅशची उपलब्धता ७ हजार टनांपर्यंत आहे.
युरियाची सर्वाधिक मागणी
जिल्ह्यात युरियाची मागणी सर्वाधिक आहे. १ लाख मेट्रीक टन युरियाचा वापर दरवर्षी हाेताे. येत्या खरीपासाठी जून महिन्यापर्यंत खतांची उपलब्धता वाढवण्यावर कृषी विभागाचा भर आहे.
पुढील महिन्यात ५० हजार टन येणार
व्यापाऱ्यांकडील खतांची उपलब्धता पाॅस मशीनद्वारे दरराेज कळत असल्याने कृषी विभागाकडूनउपलब्ध अाणि विक्री झालेल्या खतांबाबत माहिती अपडेट केली जाते आहे. पुढील महिन्यात जिल्ह्यात ५० हजार टन खतांची उपलब्धता हाेण्याची शक्यता अाहे. खरीप सुरू हाेण्यापुर्वी अडीच लाख टन खतांचा पुरवठा करण्याचे कृषी विभागाचे उद्दीष्ट आहे.