⁠ 
सोमवार, एप्रिल 29, 2024

शेतकर्‍यांनो सावधान, जळगाव जिल्ह्यात बनावट खतांचा पुरवठा

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मे २०२३ | खरिप हंगामची तयारी अद्याप पूर्णपणे सुरु झाली नसतांना बनावट खतांचा भूत शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसले आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यात बनावट पोटॅश खताची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाने सापळा रचत पोटॅश खताच्या ९६ हजार ९०० रुपयांच्या एकूण ५७ बॅग मुद्देमाल जप्त केल्याने बनावट खते विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गत हंगामातही बनावट खतांमुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यामुळे यावेळी शेतकर्‍यांनी खते खरेदी करतांना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी पोटॅश खते खरेदी केल्यानंतर ते बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी दीपक सांळुखे व अरुण तायडे यांनी या शेतकर्‍याकडे जाऊन पोटॅश या खताची बॅगची व त्यामधील खताची तपासणी केली असता त्यांना या खताबाबत बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. त्यानंतर त्यांनी शेतकर्‍यास विचारले असता त्यांनी सांगितले, की मंगलचंद झुंबरलाल जैन (मु.पो. तोंदे, ता. शिरपूर) यांनी त्यांना या खताच्या ७ बॅग १ हजार ७०० रुपये दराने आणून दिल्या होत्या. या खताची पावती अथवा बिल दिले नव्हते. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने जैन यांच्या दुकानाच्या गोदामात छापा मारला असता त्या ठिकाणी म्युरीट ऑफ पोटॅश (एमओपी) या आयपीएल कंपनीच्या बनावट प्रति बॅग ५० किलो वजनाची खताच्या ५७ बॅग आढळून आल्यात.

हा खत साठा कैलास वासुदेव पाटील (रा. तोंदे) यांचा असल्याचा लेखी कबुली जबाब सुरजमल जैन यांनी दिला. त्यावरून कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट खत विक्रीसाठी आणले. कैलास पाटील यांना सुरजमल जैन यांच्या भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता हे खत किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद) यांनी बिगर बिलाचे दिले असल्याचे सांगितले. यानुसार बनावट खताच्या ५७ बॅग प्रति बॅग ५० किलो वजनाची, प्रति बॅग किमंत १ हजार ७०० प्रमाणे मुद्देमाल ९६ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन करण्यात आला.

तोंदे गावात साठवणूक केलेले खत हे हातेड खुर्द (ता.चोपडा) येथील शेतकरी किशोर पाटील यांना देऊन फसवणूक केली. म्हणून मंगलचंद झुबंरलाल जैन (रा. तोंदे, ता. शिरपूर), कैलास वासुदेव पाटील (रा. तोंदे), किशोर शालिकराव पाटील (रा. करवंद, ता. शिरपूर) या आरोपींनी संगनमताने नकली खत शेतकर्‍यांना विक्रीसाठी आणल्याने शेतकर्‍याची व शासनाची फसवणूक केल्याने धुळे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या फिर्यादी वरून थाळनेर (ता. शिरपूर) या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांच्या आग्रहामुळेच होतो खतांचा काळाबाजार
शेतकर्‍यांनी ठराविक कंपनीच्या, ठराविक खतांच्या मागे न लागता उपलब्ध सरळ खतांचा (नत्र, स्फुरद, पालाशयुक्त) उपयोग करावा. युरिया, डीएपी तसेच म्युरेट ऑफ पोटॅश यांचे मिश्र खत वापरणे फायद्याचे ठरू शकते. मात्र ठराविक खतांसाठी शेतकर्‍यांचा आग्रह हेच खतांच्या काळाबाजाराचे मुख्य कारण ठरते. युरिया, डीएपी तसेच म्युरेट ऑफ पोटॅश यांचे मिश्र खत करून ते वापरणे फायद्याचे ठरू शकते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यातून खतांच्या काळ्या बाजाराला आणि लिंकिंगला देखील काही प्रमाणात आळा बसू शकेल.

घरच्या घरी खतांची तपासणी कशी करावी?
गेल्या काही वर्षात खतांच्या किमती दोन ते अडीच पटीने वाढल्या. वाढत्या किंमतींसह भेसळही वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे खतातील भेसळीची चाचणी करूनच शेतकर्‍यांनी खते वापरली पाहिजेत. अनेकदा स्वस्त खतांच्या लालसेपोटी शेतकरी परवाना नसलेल्या दुकानातून किंवा खते विकणार्‍यांकडून खते घेतात. यातूनच त्यांची फसवणूक होते. यामुळे खते विकत घेण्याआधी ते खरे आहे की बनावट? याची तपासणी शेतकर्‍यांनी स्वत:च करायला हवी. ही तपासणी कशी करावी? याची माहिती आज आपण जाणून घेवूयात.

अशी करा डीएपीची तपासणी
डीएपी खरा आहे की बनावट हे ओळखण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रथम डीएपीचे थोडे दाणे हातात घेऊन त्यात चुना टाकून तंबाखूसारखा मळून घ्या, जर त्याचा वास तीव्र असेल, ज्याचा वास घेणे कठीण असेल, तर हे डीएपी खरा असतो. डीएपीचे खरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दाणे कडक असतात आणि नखांनी सहज तुटत नाहीत. ते राखाडी काळा आणि तपकिरी रंगाचे असतात.

अशी करा युरिया, पोटॅश आणि सुपर फॉस्पेटची तपासणी
युरिया ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काही युरियाचे दाणे घ्या आणि तव्यावर गरम करण्यासाठी ठेवा. थोड्यावेळात तव्यावर युरियाचे अवषेशही दिसले नाही तर तो खरा युरिया आहे. युरिया ग्रॅन्युल जवळजवळ समान आकाराचे चमकदार पांढरे आणि कडक असतात. ते पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि त्याचे द्रावण स्पर्शास थंड वाटते. पोटॅश ओळखण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा, काही पोटॅश दाण्यांवर पाण्याचे काही थेंब टाका, जर ते एकत्र चिकटले नाहीत तर ते खरे पोटॅश आहे. जेव्हा पोटॅश पाण्यात विरघळते तेव्हा त्याचा लाल भाग पाण्यात तरंगतो. सुपर फॉस्फेट ओळखण्यासाठी त्यातील काही कणके गरम करा, जर ते फुगले नाहीत तर हे खरे सुपर फॉस्फेट असते. त्याचे दाणे कठिण असतात आणि नखांमधून सहज काढले जातात. त्याचा रंग तपकिरी काळा असतो.

अशी करा झिंक सल्फेटची तपासणी
झिंक सल्फेटमध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्हींचा आकार सारखाच असल्याने त्याचे खरे आणि बनावट ओळखणे कठीण असते. जर मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेटमध्ये मिसळले गेले असेल तर ते ओळखण्यासाठी काही बाबी आहेत. डीएपी द्रावणात झिंक सल्फेटचे द्रावण जोडल्यास जाड जाड अवशेष तयार होतात. जेव्हा डीएपीच्या द्रावणात मॅग्नेशियम सल्फेटचे द्रावण जोडले जाते तेव्हा असे होत नाही. जर आपण झिंक सल्फेटच्या द्रावणात कॉस्टिकचे द्रावण जोडले तर एक पांढरा, डांबरसारखा अवशेष तयार होतो. त्यात जाड कॉस्टिक द्रावण जोडल्यास हा अवशेष पूर्णपणे विरघळतो. त्याचप्रमाणे झिंक सल्फेटच्या जागी मॅग्नेशियम सल्फेट वापरल्यास अवशेष विरघळत नाहीत.