जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. ऑनलाईन सायबर ठगांकडून नागरिकांना हजारो-लाखो रुपयांचा गंडा घातला जात असून अशातच आता सायबर चोरट्यांनी शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमका प्रकार काय?
एकीकडे शेतकर्यांना PM किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा असताना, या योजनेच्या नावावर बनावट लिंक पाठवून नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. ही लिंक उघडताच शेतकर्यांच्या मोबाईल फोन हॅक करून बँक खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत.
फसवणूक कशी होते?
सायबर गुन्हेगार शेतकऱ्यांना सोशल मीडियावर पीएम किसान योजनेशी संबंधित असल्याचा दावा करून एक बनावट फाईल पाठवतात. शेतकरी ही फाईल अधिकृत असल्याचा समज करून ती ओपन करतात, ज्यामुळे त्यांच्या मोबाइलमध्ये विशिष्ट प्रोग्राम ॲक्टिव्ह होतो. या प्रोग्रामद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले जातात.
फसवणूक कशी टाळायची?
शेतकऱ्यांनी व्हॉट्सअॅप, मेसेज किंवा अन्य गटांमधून आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. पीएम किसान योजनेशी संबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in येथे जावे किंवा जवळच्या (CSC) केंद्रात संपर्क साधावा. प्रत्येक कॉलवर विश्वास ठेवू नये; व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमांतून आलेल्या फेक कॉलमधूनही तुमची फसवणूक होऊ शकते. या कॉल्समध्ये तुम्हाला तुमच्या हफ्त्याची प्रक्रिया, कागदपत्रे पूर्ण करण्याच्या नावाने पैसे मागितले जातात. कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका आणि ओटीपी किंवा व्यक्तिगत माहिती शेअर करू नका. पीएम किसानची ई-केवायसी प्रक्रिया फक्त अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वरून किंवा जवळच्या (CSC) केंद्रातूनच करा. कधीही फोनवर आलेल्या लिंकवर क्लिक करून ई-केवायसी करू नका.