जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२४ । जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असतांना विजेचा जोरदार शॉक लागून ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. संजय बापू पाटील (वय ४२, रा. धानवड, ता. जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकरी संजय पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचे उमाळा शिवारात शेत असून त्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचलेले होते. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संजय पाटील हे पत्नी, वहिनी व पुतणीसह शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी गेले होते.
शेतातील विहरीजवळ लावलेली मोटार सुरु करण्यासाठी संजय पाटील हे त्याठिकाणी गेले असता, त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून ते शेतात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तातडीने नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.