जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । जळगाव शहरासह परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचले आहेत. याच दरम्यान आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यात बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी घडली. यावेळी बैलांच्या दोऱ्या सोडल्याने बैल हिसके देऊन बाहेर आले. पण शेतकरी स्वतः बुडाला. सुकलाल लालचंद माळी (वय ६३ रा. आसोदा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
काय आहे नेमकी घटना?
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील शेतकरी सुकलाल माळी हे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान रस्त्यावर रेल्वेचा बोगदा आहे. पहाटे जोरदार पाऊस झाल्याने पावसामुळे या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते.त्यावेळी याकडून पलीकडे जाण्यासाठी सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्याखालून जाण्यासाठी टाकली. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली.
तेव्हढयात भेदलेल्या बैलांनी झटका देवून बाहेर आले. परंतू सुकलाल माळी यांना पोहात येत नसल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यांना तपासून मयतघोषित केले. कुटुंबीयांनी प्रसंगी एकच आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यची नोंद करण्याचे काम सुरू होते