⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालातील पीजीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज| ३० जुलै २०२३| तुमची मेहनत आणि उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नाला आज फळ मिळाले आहे. तुमच्यातील शिस्त, संरक्षण आणि अफाट ज्ञानामुळे केवळ तुम्हीच मोठे नाही झाले तर संस्थेला देखील मोठे केले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रखर उन्हाळा असू दे किंवा खूप थंडी आणि भर पावसाळ्यातही तुम्ही खेडोपाड्यावर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून पोहचत होते. तेथून रुग्ण शोधून त्यांच्यावर २४ तास उपचार तुम्ही केले. हे सर्व रुग्णसेवेप्रती असलेल्या ओढीने शक्य झाले असून भविष्यात तुमच्या करिअरसाठी देखील हे पुरक ठरणार आहे. या संस्थेतून तुम्ही आज बाहेर पडून स्वत:च्या करिअरला सुरवात करणार आहे. पूर्ण विश्वासाने पुढे पाऊल टाका, खूप मेहनत घ्या, रुग्णांप्रती आत्मीयता जोपासा, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करतांना व्यवसाय भाव बाजूला सोडा, नेहमी लक्षात ठेवा औषधोपचार हा केवळ व्यवसाय नाही तर रुग्णांना बरे करण्यासाठीची तुमची वचनबद्धता आहे, त्यामुळे निस्वार्थ भावाने रुग्णसेवा करा, असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सन २०२० मध्ये प्रवेशित झालेली एम.डी. व एम.एस.साठीच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ रविवार दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता केतकी हॉल येथे आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हूणन व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरुन पुढे बोलतांना डॉ.उल्हास पाटील यांनी मॉर्निंग राऊंडचा उल्‍लेख आवर्जुन करीत या डॉक्टरांनी मागील तीन वर्षाच्या काळात दिलेले समर्पणाचा उल्‍लेख केला. या राऊंडदरम्यान तुम्हाला टेंशनही आले असेल आणि कालांतराने पहाटे उठण्याची आणि नियोजन करण्याची सवय तुमच्या अंगवळणी पडली, याचा फायदा भविष्यातही तुम्हाला होणार आहे. पहाटे लवकर उठून केलेले कामाचे नियोजन हे तुम्हाला यशाकडे घेऊन जाते, अनेक यशस्वी व्यक्‍ती सकाळी लवकर उठून संपूर्ण दिवसाचे, कामाचे नियोजन करतात आणि यश साध्य करतात, असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील यांनी सांगितले की, तुम्ही ज्यावेळी प्रवेश घेतला तो काळ कोविड आपत्‍तीचा होता. त्यावेळी सिव्हील हॉस्पिटलमधून आलेल्या रुग्णांची जबाबदारी आपल्यावर होती. ती तुम्ही खुप यशस्वीरित्या पार पाडली, याचे नेहमीच कौतुक राहिल. आता तुम्ही प्रॅक्टीस सुरु कराला, काहीही अडचण असल्यास मार्गदर्शनासाठी ही संस्था येथील प्रोफेसर्स नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. वैद्यकीय ज्ञानाने तर तुम्ही पूर्णत्वास गेले आहात आता अर्थाजनही सुुर होईल. याबाबत एक सांगेल पैशांची किंमत करायला शिका, पैशांचे योग्य नियोजन करा, असा मोलाचा सल्‍ला डॉ.वर्षा पाटील यांनी दिला. यावेळी अधिष्ठाता डॉ.एन एस आर्विकर यांनी मनापासून रुग्णसेवा करा, कामावर लक्ष केंद्रित करा, रुग्णाला वेळ द्या, त्याचे समुपदेशन करा असे सांगून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमास व्यासपीठावरील सन्माननीय अतिथींसमवेत उपस्थीत असलेेले वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.चंद्रेय्या कांते, डॉ.हरणखेडकर डॉ.दिपक अग्रवाल, डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.मयुर मुठे, डॉ.मिलिंद जोशी, डॉ.शिवाजी सादुलवाड, डॉ.सुयोग तन्नीरवार, डॉ.सी.डी.सारंग, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.अश्विनी पाटील यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्याहस्ते एमडी, एमएस उत्‍तीर्ण ३७ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन कुटूंबासह सन्मानित करण्यात आले. व्हिडीओ चित्रफितीच्या माध्यमातून तसेच काहींनी मनोगत व्यक्‍त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात काही पालकांनी देखील संस्थेच्या सहकार्याबद्दल मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सागरिका धवाण, डॉ.मोहित पाटील यांनी तर आभार डॉ.जयश्री गुंडेट्टी, डॉ.अनिकेत घोडके यांनी मानले.

–कोविडकाळातील मानवतेच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक–
याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील यांनी कोविड या महामारीच्या काळात या डॉक्टरांनी केलेली सेवेचाही गौरव केला. गेल्या काही वर्षांत जागतिक महामारीसह अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत. या कठीण काळात या बॅचच्या डॉक्टरांनी धाडसाने पाऊल उचलले आणि रुग्णसेवा केली. मानवतेची निस्वार्थ सेवा आणि ती ही संकोच न करता करणे हे खर्‍या डॉक्टराचे कर्तव्य तुम्ही बजावले असून तुमच्या या अतूट धैर्य आणि सहानुभूतीबद्दल आम्ही सर्व कौतुक करतो. पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी म्हणून तुम्हाला उत्कृष्ट शिक्षण आणि प्रशिक्षण या संस्थेने दिले असून आता पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही सुसज्ज आहात. शिकण्याची आणि प्रगती करण्याची प्रत्येक संधी स्वीकारा. वैद्यकीय सेवेत असेच समर्पण आणि सचोटी बाळगत रुग्णांना जीवनदान द्या, असेही आवाहन डॉ.उल्हास पाटील यांनी केले.