⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

बोंडअळी निर्मूलनासाठी फरदड घेऊ नये : कृषी विभागाचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ ।  जिल्ह्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे निर्मूलनाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी रोजी बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी फरदड कापूस घेऊ नये,असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक बोंडात गुलाबी अळी आहे. त्यामुळे फरदडीचे उत्पन्न येणार नाही, तसेच पुढील हंगामातही कापसाचे उत्पादन घेणे कठीण होईल, त्यामुळे फरदड न घेता कपाशीच्या पह्याट्यांपासून कंपोस्ट खत तयार करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले.

यांची होती उपस्थिती 

या बैठकीला कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे हेमंत बाहेती, पी.एस.महाजन, जिनिंग आणि प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश काबरा, सुशील सोनवणे आणि कापूस बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, या सभेच्या आधी कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाबाबत विविध कंपन्यांनी तयार केलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांकडून कापूस पिकाचा हंगाम वाढवण्यासाठी शक्यता आहे. पिकाचा हंगाम वाढल्यास गुलाबी बोंडअळीसाठी अखंडित अन्नपुरवठा होईल, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढतो, कीड नष्ट करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कापूस बियाणे कंपन्या यांच्याकडून संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत बोंड अळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कापसाची फरदड घेण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे, तसेच रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, मका यांची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तसेच कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना हरभरा, गहू, रब्बी, ज्वारी, मका अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अळी निर्मुलनाची प्रात्याक्षिके घ्या 

बंगळुरू येथी डॉ. पुरुषोत्तम देवांग यांच्या बोंडअळी नियंत्रणासाठीच्या अद्यावत तंत्रज्ञानाची नोंद घेण्यात आली आहे. त्याबाबत कृषी विभागाने विभागस्तरावर त्याची प्रात्याक्षिके घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सभेत दिल्या, तसेच कापसावर अनावश्यक कीटक नाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या पह्याट्यांपासून कंपोस्ट खत तयार करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.