गृहिणींसाठी खुशखबर : सणोत्सवाच्या सुरुवातीला तेलाच्या दरात घसरण
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे. दरम्यान, सणासुदीच्या तोंडावर आता जनतेला एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची आयात होणाऱ्या देशांमधील स्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याने तेलाच्या किमतीत पाच ते सहा रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे गृहिणींना माेठा दिलासा मिळाला आहे.
जानेवारी महिन्यापासून खाद्य तेलाच्या दरात वाढ सुरू झाली. त्यानंतर सतत भाववाढ सुरूच होती. आधीच कोरोनात महागाईचा भडका उडाला आहे. देशभरात पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे. सोबतच गॅसच्या दरात प्रचंड वाढ होऊन गॅस १००० रुपयाच्या उंबरवाड्यावर येऊन ठेपले आहे.
त्यात खाद्य तेलाच्या महागाईने सामान्यांचे घरगुती बजेट कोलमडून टाकले आहे. सोयाबीन तेलाचा किमतीत सहा महिन्यांत ३० ते ३५ रुपयांनी महागले होते. तर इतर खाद्य तेलाच्या किमतींनीही उच्चांक गाठला होता. दरम्यान, दहा-बारा दिवसांवर नवरात्री, त्यापाठोपाठ दिवाळी आहे. या काळात खाद्यतेलाची मागणी वाढल्याने दरवाढ होते; मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये तेलाच्या दरात वाढ झाली होती. आता पुन्हा त्यापेक्षा अधिक दरवाढ होणार नसल्याची शक्यता जळगावातील विक्रेत्यांनी वर्तवली.
भारतातील ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जाते तर ३० टक्के उत्पादन देशातच केले जाते. यात शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाची आयात होते तर मोहरी आणि खोबऱ्याचे उत्पादन भारतातच होते. कोरोनामुळे इतर देशांतून होणारी खाद्यतेलाची आयात बंद झाली होती. तर केंद्र सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केली होती. भारतात सोयाबीन पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. त्याचाच परिणाम तेल उत्पादनावरही झाला होता. आता सर्व स्थिती पूर्ववत झाल्याने तेलाच्या दरात पाच ते सहा रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
असे आहेत तेलाचे दर
पंधरा दिवसांपूर्वीचे दर :
शेंगदाणा १८०
सूर्यफूल १६५
सोयाबीन १५३
सध्याचे दर
शेंगदाणा १८०
सूर्यफूल १५७
सोयाबीन १४८