⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

भाजपला सोडचिठ्ठी देऊन श्रीराम पाटील शरद पवार गटात ; रावेरमधून उमेदवारीचे संकेत, आज घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सक्षम उमेदवाराचा शोध गेल्या अनेक दिवसापासुन सुरु आहे. अखेर हा शोध आज थांबणार आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांचे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट पक्के मानले जात आहे. आज मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांची घोषणा होऊन २६ दिवस उलटले आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघातील मविआचा उमेदवारही निश्चित झाला; परंतु रावेरमधील उमेदवाराबाबतचा तिढा कायम होता.

जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, श्रीराम पाटील व माजी आमदार संतोष चौधरी हे तिघेही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. उमेदवारी निश्चितीसाठी चार वेळा बैठकांचे सत्र पार पडले. पाचवी बैठक काल सोमवारी पुणे येथे मोतीबागेत झाली. यात स्वत: शरद पवार यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यात रवींद्रभैय्या पाटील व श्रीराम पाटील यांची नावे अंतीम निश्‍चीत करण्यात आली. यानंतर रात्री उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला.

त्यानुसार श्रीराम पाटील यांचे नाव रावेरातून पक्षातर्फे उमेदवार म्हणून निश्‍चीत झाले असून आज पत्रकार परिषदेत याची घोषणा होणार आहे. श्रीराम पाटील यांनी गेल्या महिन्याच्या मध्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. आता ते थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.