जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी बोगस शिक्षक भरती प्रकरणे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यांपाठोपाठ आता जामनेर तालुक्यातून देखील बोगस शिक्षक भरतीचा प्रकार समोर आला असून यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जामनेरच्या पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने पाठवलेल्या चुकीच्या संचमान्येनुसार ७ बोगस शिक्षकांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने या सर्व शिक्षकांच्या नावे मागील फरकासह नियमित वेतन देखील काढून दिले आहे. या संदर्भात तक्रार येताच शिक्षण विभागाने संस्थेवर प्रकरण ढकलत वेतन वसुलीसह शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाला दिली आहे.
पहूर येथील महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात १० शिक्षक आणि तीन शिक्षकेतर कर्मचारी आहेत. केवळ १३ पदांना संचमान्यतेनुसार मंजुरी असतांना संस्थेने एकुण २० कर्मचाऱ्यांची वेतनासह मागील थकीत बिले सादर केली होती. शिक्षण विभाग, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने फेब्रुवारी महिन्यात मान्यतेशिवाय बिले सादर केलेल्या ७ कर्मचाऱ्यांचे ४० लाखांवर बिल मंजुर केले आहे. संस्थेने सादर केलेला चुकीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मंजुर करण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाने मात्र संस्थेवर खापर फोडून कारवाईचे पाऊल उचलले आहेत.
दरम्यान, पहूर येथील प्रकरणाबाबत वेतन पथकाच्या अधीक्षकांना नोटीस दिली आहे. मुख्याध्यापकांकडून तत्काळ काढलेली रक्कम पुन्हा वसूल करणे तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे कल्पना चव्हाण (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) यांनी दिले.