जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२४ । रावेर- यावल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचार सभेसाठी आज फैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे एकत्र लढत आहे मात्र राहुल बाबा सावकारांचा विरोध करीत आहे. तरी उद्धव ठाकरे यांच्यात दम असेल तर त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून सावरकर यांच्या बद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवावेत असे खुले आव्हान अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
10 नोव्हेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता आणि भगवा फडकवला होता. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी हे शिवाजी महाराजांच्या सिद्धांतांवरच एकत्र आले. या राज्याला नंबर वन करायचे आहे, त्यासाठीच महायुती सरकार व युती गटबंधन तयार झाले आहे.
यापुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील संस्कृती, संस्कार जपण्यासाठी युतीचे सरकार बनले आहे. नुकतेच एका मुस्लिम संघटनेने काँग्रेसला दहा टक्के राज्यात मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केले आहे. आधीच 50 टक्के आरक्षण आहे, त्यामुळे जर मुस्लिमांना आरक्षण देण्याचे ठरले तर दलित ओबीसी आदिवासी यांचे आरक्षण कापावे लागेल म्हणजे त्याचे आरक्षण कमी होईल मात्र भारताच्या संसदेत किंवा विधानसभेमध्ये जोपर्यंत भाजपाचा एकही संसद आहे, तोपर्यंत हे आरक्षण तो होऊ देणार नाही असे यावेळेस ते म्हणाले.
काँग्रेस पार्टी व शरद पवार यांनी गेल्या 70 वर्षापासून राम मंदिराचा प्रश्न भिजत ठेवला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आणलं. पहिल्यांदाच साडेपाचशे वर्षानंतर राम लल्लाने आपल्या मंदिरात पहिली दिवाळी मनवली असे अमित शाह म्हणाले.
या युती सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर ठेवले त्यावेळेस याच आघाडीवाल्यांनी त्याला विरोध केला. राम मंदिर बनवण्यासाठी यांचा विरोध, ट्रिपल तलाक हटवण्यासाठी यांचा विरोध, 370 कलम हटवण्यासाठी यांचा विरोध आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्ड याचा कानून बदलण्याचा निर्णय घेतला त्यालाही आघाडीने विरोध केला. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र नंबर वन ला जाईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.