जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । जळगावहून औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोरणाला पाठाड तांडा फाटा येथे चारचाकीने जात असलेल्या प्रवाशांना विना शीर असलेला मुलगा आणि स्त्री दिसल्याचा व्हिडीओ काल दिवसभर व्हायरल होत होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पहूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
जामनेर तालुक्यातील फत्तेपूरसह परिसरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शिर नसलेला एक मुलगा व एक महिलेचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. शिर नसलेला एक मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत असल्याचा हा व्हीडीओ बुधवारी रात्री काही तरूणांनी चारचाकी वाहनाच्या प्रकाशात तयार करून फत्तेपूर तोरणाळ्या दरम्यान असलेल्या पठाळ फाट्यावर भूत फिरत असल्याचा मजकूर त्यावर टाकून गुरूवारी तो व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
त्यामुळे फत्तेपूरसह तोरणाळा, देऊळगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत जामनेर तालुक्यात चर्चा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याबाबत फत्तेूपर येथील काही सुज्ञ नागरीकांनी हा विषय पोलिसांच्या कानी घातला असून याप्रकरणी फत्तेपूर औटपोस्टच्या पोलिसांनी तीन तरूणांना ताब्यात घेऊन रात्री उशीरा पहूर पोलिस ठाण्यात तपासासाठी हजर केले. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत त्या तरूणांना विचारपूस सुरू असल्याची माहिती पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली आहे.
अप-डाऊन करणारे नागरिक धास्तावले
फत्तेपूर येथून नोकरी आणि व्यावसायानिमित्त अनेकजण देळूगाव, सावळदबारा, धामणगावसह अन्य ठिकाणी ये-जा करीत असतात. शिरविरहीत धडाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर अप-डाऊन करणाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. फत्तेपूर, देऊळगाव परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.