जळगाव लाईव्ह न्यूज| ३० जुलै २०२३| खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथील अनाथ मुलांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी काळजीवाहक गणेश पंडित अटकेत होता. वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची तक्रार पीडिताने दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. काळजीवाहक गणेश पंडित याच्या चिथावणीमुळे अनाथ मुलांच्या बालगृहातील काही अल्पवयीन मुलांनी अत्याचार पीडित मुलास मारहाण केल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष, त्यांची दोन्ही मुले, काळजीवाहक व मारहाण करणारी आठ अल्पवयीन मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडके बुद्रुक येथे तळई येथील (कै.) यशवंतराव बळीराम पाटील शिक्षणप्रसारक मंडळ संचालित अनाथ मुलांचे व मुलींचे बालगृह आहे. या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अत्याचार केले. तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार दाखल झाली आहे. संशयित गणेश पंडित यास अटक केली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २९) बालगृहातील अल्पवयीन मुलानेही, गणेश पंडित याने अत्याचार केल्याची तक्रार केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली.
अकरावर्षीय अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की होळीच्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलाने पाणी भरले नाही म्हणून वसतिगृहाचा काळजीवाहक पंडित याच्या सांगण्यावरून अनाथ अल्पवयीन मुलांनी पीडितास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच, काळजीवाहक पंडित याने एका रविवारी दुपारी दीडच्या सुमारास वसतिगृहात कोणीही नसल्याचा फायदा घेत पीडित मुलगा स्वच्छतागृहात गेला असता त्याच्यावर शारीरिक अत्याचार केला.
जळगाव येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीनंतर अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याचे उघडकीस आले.चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.याबाबत पीडित मुलाच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, सचिन प्रभाकर पाटील, भूषण प्रभाकर पाटील यांच्यासह वसतिगृहातील आठ अल्पवयीन मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक गोराडे तपास करीत आहेत.