जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर देशात मार्च २०२० मध्ये रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना संसर्ग कमी झाल्याने रेल्वे पुन्हा रुळावर आली आहे. मात्र अद्यापही पॅसेंजर गाड्या बंदच असल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तब्बल अडीच वर्षानंतर भुसावळ-सूरत सायंकाळची पॅसेंजर गाडी आता १५ जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, पॅसेंजर ऐवजी या गाडीला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल ५० रुपयांची भाडेवाढ झाली आहे. प्रवाशांना सूरतसाठी आता भुसावळहून ७० रूपयांऐवजी १२० रूपये भाडे माेजावे लागेल.
कोरोनाच्या नावाखाली लूट
एकीकडे कोरोनाच्या नावाखाली रेल्वेकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु आहे. कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या गाड्या आता पूर्वपदावर आले आहे. असे असले तर अद्यापही या गाडयांना आरक्षित तिकीट करूनच प्रवास दिला जात आहे. त्यातही अनेक पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय. सध्या सुरु असलेल्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळतेय.
भुसावळ येथून सुटणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच आहे. पॅसेंजर ऐवजी काही मेमू गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र त्या मेमू गाड्यांचे दर देखील एक्सप्रेस इतके आहे. एकप्रकारे कोरोनाच्या रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी लूट सुरु ठेवली आहे.
भुसावळ येथून सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ-सूरत गाडी सुटत हाेती.काेराेनाच्या काळात बंद असलेली ही गाडी अजूनही सुरू झालेली नाही. दरम्यान, पश्चिम रेल्वे अंतर्गत धावणारी भुसावळ-सूरत पॅसेंजर गाडी ही ९ जूनपासून सुरू हाेणार हाेती. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून ही गाडी पुन्हा स्थगित करण्यात आली. आता ती सुरू होणे निश्चित झाले असून १५ जूनपासून धावणार आहे. मात्र, या गाडीला पूर्वीप्रमाणे पॅसेंजर नव्हे तर एक्स्प्रेसचा दर्जा असेल. गाडीचा क्रमांक देखील ५९०१४ ऐवजी १९००६ व १९००५ असा असेल. थांबे मात्र पूर्वीप्रमाणे पॅसेंजर गाडीचे असतील. त्यात काहीही बदल झालेला नाही. मात्र, आधीच्या वेळेपेक्षा ही गाडी भुसावळ येथून एक तास विलंबाने सुटणार आहे.
येथे थांबणार गाडी
या गाडीला भादली, जळगाव, पाळधी, चावलखेडे, धरणगाव, भोणे, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होळ, सिंदखेडा, सोनशेलू, विखरण रोड, दोंडाईचा, रनाळा, टिसी, नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, नवापूर, उकई, नवा सोनगड, व्यारा, माही, बारडोली, चलथान, उधना असे थांबे आहेत. दोन एसी थ्री टियर, आठ स्लिपर, सात द्वितीय श्रेणी बोगी (दोन गार्ड ब्रेक वॅनसह) अशी रचना असेल.
असे आहे गाडीचे अप-डाउनमध्ये वेळापत्रक
१९००५ सूरत-भुसावळ ही गाडी १३ जूनला रात्री ११.१० वाजता सूरत स्थानकातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता भुसावळात पोहोचेल. तर १९००६ भुसावळ-सूरत ही गाडी १५ जूनला सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सूरतला पोहोचेल.
असे असेल भाडे
स्थानक पूर्वीचे नवीन
जळगाव १० ३०
धरणगाव १५ ३५
दाेंडाईचा ३५ ६५
नरडाना २५ ५५
नंदूरबार ४० ७५
नवापूर ५० ९०
व्यारा ६० १००
उधना ७० १२०
सूरत ७० १२०