⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

गृहिणींना आनंदवार्ता ; महागलेलं खाद्यतेल होणार स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२४ । गेल्या काही महिन्यात अन्नधान्य, डाळी, भाज्या, मसाले आणि इतर पदार्थ महागल्याने गृहिणींचे किचन बजेट कोलमडले, पण केंद्र सरकार या कोलडमडेल्या किचन बजेटला थोडा दिलासा देण्याच्या तयारीत आहेत. आगामी अर्थसंकल्प आणि लोकसभा (सार्वत्रिक) निवडणुकांपूर्वी केंद्रातील मोदी सरकार ग्राहकांना मोठा दिला देण्याची तयारी करत आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने खाद्य तेल उत्पादक कंपन्यांना एक पत्र लिहिले आहे. सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाला जागतिक स्तरावरील किंमती आधारे खाद्यतेलाच्या भावात कपातीचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो.

सध्या जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र देशातील जनतेला स्वस्त खाद्यतेलाचा दिलासा मिळाला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या किमतीत काही प्रमाणात कपात झाली होती, मात्र यावर्षी जानेवारीत खाद्यतेलाचे दर पुन्हा कडाडले. याशिवाय पुढील काही महिन्यांत देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीबाबत सरकार अत्यंत सावध असून सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय किंमतीच्या पार्श्वभूमीवर उत्पादनाची किंमत कमी करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने खाद्यतेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होत असताना देशांतर्गत बाजारातही दर कमी करायला सांगितले आहे. मात्र, खाद्यतेल कंपन्यांनी सध्या किमती कमी करण्यास असमर्थता व्यक्त केली आणि पुढील महिन्यापासून मोहरी काढणीला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले असून नवीन पीक आल्यानंतरच दरात कपात शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं. म्हणजेच मार्चपर्यंत खाद्यतेलाच्या किमती समान राहणे शक्य आहे.