सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक व परिवार दिवस उत्साहात; २५ अर्जांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश

मे 20, 2026 6:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता, माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच त्यांच्या अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचे त्वरीत निराकरण व्हावे, या उद्देशाने “सैनिक, माजी सैनिक व परिवार दिवस” कार्यक्रम आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे होते.

sainikprogram

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर, तहसीलदार डॉ. उमा ढिकले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख काशिनाथ मोरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (प्रभारी) संजय रामराव गायकवाड तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने अॅड. संदीप पाटील, अॅड. भारती कुमावत व अॅड. रूपाली कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता, माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (प्रभारी) संजय रामराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकानंतर उपस्थित माजी सैनिकांच्या विविध समस्या व अडचणींचे निवारण करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित वीरनारी, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक यांच्या अडचणी समजून घेत संबंधित विभागांना त्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. देशसेवेसाठी प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हरकर यांनी प्रलंबित प्रकरणांबाबत मार्गदर्शन करून संबंधित अर्जांवर शेरा देत ते पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयांकडे पाठविण्याचे निर्देश दिले. या सैनिक, माजी सैनिक व परिवार दिवस कार्यक्रमात एकूण २५ अर्ज प्राप्त झाले असून त्यावर तातडीने कार्यवाही करून निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले.

यावेळी माजी सैनिक ईश्वर मोरे यांनी जिल्ह्यात सैनिक कॉलनी उभारणीच्या प्रलंबित विषयाकडे लक्ष वेधून. जिल्हाधिकारी यांच्याकडे सैनिक कॉलनी उभारण्याची मागणी केली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने उपस्थित अॅड. भारती कुमावत यांनी वीरनारी, वीरपिता, माजी सैनिक व सैनिक कुटुंबीयांना न्यायालयीन सल्ला व कायदेशीर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण संघटक विश्वनाथ उगले यांनी केले तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (प्रभारी) संजय रामराव गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now