अशफाउल्ला खान सार्वजनिक वाचनालयातर्फे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाचनामुळे आपल्या सामाजिक जाणिवा समृद्ध होतात. व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो म्हणून शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा,असे मत येथील उपक्रमशील शिक्षक आनंद सपकाळे यांनी व्यक्त केले. खडका येथील शहिद अशपाक उल्ला खान सार्वजनिक वाचनालयातर्फे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक हाजी अब्दुल मजीद खान होते. शहरातील एम.आय. तेली इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये हा बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.
व्यासपीठावर उर्दू केंद्रप्रमुख आशिक हुसेन खान मोहम्मद, समाजसेविका अरशीननाज हाजी शे. शरीफ, अजीजाबी हकीम खान उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात माजी मुख्याध्यापक हाजी अब्दुल मजीद खान यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक कामासाठी गरजेपुरताच केला पाहिजे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर दुष्परिणाम होत आहेत. केंद्रप्रमुख अशिक हुसेन खान मोहम्मद यांनी सुध्दा आपल्या मनोगतातून या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. भुसावळ तालुक्यातील उर्दू माध्यमाच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक, न.पा.तसेच जि.प.च्या शाळांमधील 77 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. इयत्ता पाचवी ते आठवीचा प्रथम गट तर इयत्ता नववी ते बारावीचा द्वितीय गट. अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. महान वैज्ञानिक डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन व कार्य तसेच मोबाईलचे फायदे व तोटे हे स्पर्धेचे विषय होते.
विजेते विद्यार्थी असे- प्रथम गट- प्रथम- अक्सा शेख शकील (एम. एच. शेख उर्दू शाळा), द्वितीय- हुमेरा बशीर बेलदार (एम.एच.शेख उर्दू शाळा),तृतीय क्रमांक- ऊसेब अतीक अहमद (अलहिरा उर्दू शाळा), द्वितीय गट- प्रथम क्रमांक- असमा कौसर कलीम अहमद (बी.झेड.उर्दू हायस्कूल), द्वितीय क्रमांक- मसीरा मोईनोद्दीन (अलहिरा उर्दू शाळा), तृतीय क्रमांक- सानिया नाज शे. रफिकोद्दिन (रजा हुसेन उर्दू हायस्कूल). सूत्रसंचालन रीजवान खान अजमल खान यांनी तर आभार वाचनालयाचे अध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक असिफ मिर्झा यांनी मानले. यशस्वीतेसाठी अफसर शेख, इमरान शेख, वसीम खान, तौसीफ अहमद आणि ग्रंथपाल समीर खान यांनी सहकार्य केले.