जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगांव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातला असून राज्यात देखील कोरोनाने शासनासह नागरीक हैराण झाले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना वाढला कसा? असा संतप्त सवाल केला जात असून कोरोना वाढीची अनेक कारणे सांगितली जात असली तरी जिल्ह्यात एरंडोल देखील कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ घातला आहे.
त्यातच एरंडोल शहरातील गल्ली बोळातील अस्वच्छता, घाण आणि म्हसावद रस्त्यावरील धुळीने कोरोना फोफावल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. त्यामुळे अधिकारींना हे का कळले नाही? असा संतप्त सवाल आहे. त्यातच एरंडोलचे उच्च पदस्थ अधिकारी (प्रांत, तहसिलदार, पोलिस निरीक्षक) आमदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक सारेच कसे डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे आहेत का? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. त्यात सामान्य माणूस भरडला जात असून पायी चालणारे, सायकल, मोटार सायकल वापरणारेंनाच त्रास असून चारचाकीतून काचा बंद करून फिरणार्यांना घाण, अस्वच्छता, धुळ विखुरलेल्या खडीचा त्रास जाणवणार कसा ? त्यांना कोरोना होणार कसा ? असाही सवाल आहे.
अस्वच्छता, घाण, नपाची उदासिनता –
एरंडोल शहर 35 हजार लोकसंख्या परंतू स्वच्छतेबाबत कमालीचे दुर्लक्ष, बोलघेवडेपणा, स्वच्छतेबाबतची फोटो प्रसिध्दी केविलवाणा असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. नागरीकांनी लेखी तक्रार, तोंडी तक्रार देवून खोटे आश्वासन दिले जाते. पद्माई पार्कमधील नागरीकांनी 3 महिन्यांपूर्वी काटेरी झुडूपे, घाण, शोषखड्डा याबाबत रहीवाशांची लेखी निवेदन देवून देखील कार्यवाही नाही. तीच गोष्ट गांधीपुरा भागातील वखारगल्ली, फकीरवाडा परिसराची. तेथील रहिवासी तर जिल्हाधिकारींना निवेदन देण्याच्या तयारीत आहेत, आता बोला…. प्रशासन मस्त… नागरीक त्रस्त…. कोरोना वाढणारच.
अंजनी नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष-झाली गटारगंगा :-
एरंडोल शहराचे दोन भाग करणारी ऐतिहासिक महत्व लाभलेली अंजनी नदी म्हणजे गटारगंगा झाली असून जिल्हाधिकारींनी दखल घेवून कडक सुचनापत्र देवून थातुर-मातूर स्वच्छ करून, फोटो काढून माहिती पाठविल्याची करामत एरंडोल नपानेच करून दाखविली. एवढेच काय दोन वर्षांपासून अंदाजपत्रक़ात तरतूद करून देखील नपाने सुशोभिकरण करू नये ही खेदाची बाब आहे. मागील वर्षापासून कोरोनाचे कारण सांगून नागरीकांची दिशाभूल केली जात आहे. वास्तविक अंजनी नदीकाठ (दोन्ही) चांगले केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. हे सर्व खरे असले तरीपण लक्षात घेतो कोण?
म्हसावद रस्ता शहरीभागाचे संथगतीने काम :-
एरंडोल-म्हसावद रस्त्याचे काम दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. कधी दोन महिने तर कधी तीन महिने काम बंद ठेवून नागरीकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शहरी हद्द (वीज मंडळपर्यंत) काँक्रीटीकरणाचे गौडबंगाल समजले नाही. ठेकेदार, वीजमंडळ, सा. बां. विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने काम रेंगाळले आहे. आता तर तीन महिन्यांपासून सरस्वती कॉलनी ते तहसिल कार्यालयाचा रस्ता दोन्ही बाजूने खोदून काम बंद आहे. यासाठी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणाच असल्याचे समजले. 26 जानेवारी आमदारांकडे देखील तक्रार केली तरीही बंदच, एवढेच काय मराठी, हिंदी सर्वच वृत्तपत्रांमध्ये संथगतीने काम, नागरीकांना श्वसनाचा त्रास, पाठीच्या दुखण्याचा, अपघातांचा त्रास झाल्याचेही स्पष्ट करून सर्वच तक्रारींना केराची टोपली.
अधिकारी, पदाधिकारी डोळे असून….:-
म्हसावद रस्त्याने नेहमीच मोठी वाहतूक असते. याच रस्त्याने ग्रामीण रूग्णालय, प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक यांचे नेहमी येणे-जाणे दररोज 2/4 वेळा असतेच. खेदाची बाब म्हणजे गंभीर पेशंटला अॅम्ब्यूलन्सने नेत असतांना खड्डे, खडीचा खूप त्रास सहन करून वाहकाला कसरत करावी लागते. नातेवाईक़ मात्र जीव मुठीत धरून पेशंटकडे आशाळभूत नजरेने पाहतात एवढेच….
प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक़, मेडीकल ऑफीसर, नपा मुख्याधिकारी (सध्या दीडी लाखांच्या लाचप्रकरणी संशयाच्या भोवर्यात) नगराध्यक्ष, वीज मंडळ अधिकारी, महाविद्यालयप्रमुख आदींचा याच मार्गाने नेहमी वावर असून देखील रस्त्याच्या दुर्दशेबाबत, तीन महिन्यांपासून नागरीकांना होणार्या त्रासाबाबत दखल घेवून नये ही खेदाची, संतापजनक बाब आहे. वास्तविक प्रांताधिकारींचे कार्यालय याच रस्त्यावर असल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारींना जाब विचारू शकले असते परंतू नागरीकांनीच प्रत्येक वेळी तक्रार करावी का ? वृत्तपत्रे ही जनमानसातील आरसा असतात. निदान त्यातील वस्तूस्थिती, सत्यपरिस्थिती स्पष्ट असून देखील जबाबदार अधिकारी, पदाधिकारी जेव्हा बेजबाबदारपणे वागून नागरीकांच्या समस्यांकडे, तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात त्याचवेळेस सहज शब्द बाहेर पडतात, सारेच कसे डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे एवढेच…