विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, अभियंत्याला झाले दर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात रविवारी सायंकाळी बिबट्याचा वावर दिसून आला असून एका उपअभियंत्याला बिबट्याचे दर्शन झाले आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून एरंडोल वन परिक्षेत्र अधिकारी यांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.
सोमवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यापीठ परिसराची पाहणी करण्यात आली आहे. विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई असल्यामुळे येथे वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे आधीदेखील आढळून आले आहे. काही वेळेस विद्यापीठ परिसरात बिबट्याच्या खुणादेखील आढळून आल्या होत्या. त्यातच काही महिन्यांपूर्वीसुद्धा कर्मचारी निवासस्थानाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर ट्रैप कॅमेरे बसविण्यात आले होते परंतु, बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला नव्हता.
रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विद्यापीठातील निवासी उपअभियंता राजेश पाटील हे विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गेस्ट हाऊस मागील हनुमंत खोरा रस्त्यावर त्यांना अचानक बिबट्याचे दर्शन घडले. पण, क्षणार्धात बिबट्या वृक्षांमध्ये निघून गेला. त्यानंतर ही बाब त्यांनी विद्यापीठ कळविली.
विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसून आल्याने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वावर संदर्भात विद्यापीठाने वनविभागाला पत्र पाठविले असून त्यात बिबट्याच्या अधिवासाच्या सवयीचा अभ्यास करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबत ट्रॅप कॅमेरे बसविण्यात यावे व विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांसाठी, परिसंस्थांमधील वसतिगृहात राहणाऱ्या मुला-मुलींसाठी व रहिवाशांसाठी समुपदेशन घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीनंतर वनक्षेत्र विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी विद्यापीठ परिसराची पाहणी केली. त्यानंतर ते रहिवासी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.