⁠ 
रविवार, मे 5, 2024

निंभोराच्या दलित वस्ती परिसरात घाणीचे साम्राज्य; नागरिक म्हणाले..

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन मागील दलितवस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून याकडे ग्रामप्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला असल्याने कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे.

तालुक्यातील निंभोरा बु. गावात एकुण ६ वार्ड असून त्यांपैकी वार्ड क्रं.६.चा‌‌ परिसर हा क्षेत्रफळाच्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने खुप मोठा आहे. मात्र, ग्रामप्रशासन या वार्डकडे सातत्याने दुर्लक्ष करुनच आहे. अद्यापर्यंत या वार्डाचा विकास झालेला नाहीय तसेच बरेच दिवसापासून ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी व ग्रामपंचायतीचे ट्रॅक्टर कचरा वाहुन नेण्यासाठी या परिसरात येत नाहीय. केवळ लोक प्रतिनिधी राहत असलेल्या परिसराजवळूनच स्वच्छता कर्मचारी ग्रामपंचायतीचे ट्रॅक्टर घेऊन परत फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तसेच अक्षय नाना तायडे यांच्या घरासमोर असलेल्या ओपन प्लेसमधील सांडपाण्याची विल्हेवाट आजपर्यं झालेली नसून या हिरवेगार पाण्यामध्ये सर्पांचे प्रमाण वाढलेले आहे. व रोगजंतु , प्लास्टिक, कचरा यांच्या वाढीमुळे दुर्गंधी पसरत आहे. डासांच्या प्रमाणातही वाढ झाली असून साथीचे , श्वसनाचे आजार उद्भभऊ शकतात. त्याचबरोबर या परिसराला लागुनच जि.प.मराठी मुलांची शाळा व अंगणवाडी आहे. या शाळांच्या आवारातही कचरा व गवताची वाढ झालेली आहे. व ओपनस्पेसमध्येही गवत वाढले असुन जमिनीचे रूपांतर दलदलीच्या भुभागामध्ये झाले आहे. गेल्या एक वर्षात या परिसरातील पावसाच्या पाण्याचे डबकेही खडी माती टाकून बुजले गेले नाही. या सर्व प्रकारा पासुन सरपंच, वार्ड प्रतिनिधी,ग्रामविकास अधिकारी परिचित असूनही ग्राम-प्रशासन लक्ष द्यायला तयार नाहीत, फक्त हो चे पाणी पाजण्यात व्यस्त आहे. अशा ग्रामप्रशानाचा फायदा तरी काय? अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील राहिवाशी यांनी ‘जळगाव लाईव्ह’च्या प्रतिनिधी शी बोलतांना दिली.

या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तणनाशक फवारणी करणे , डबके / खड्डे बुजणे. ही सर्व कामे त्वरीत करावी. शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या व रहिवासीयांच्या आरोग्याशी चालू असलेला खेळ त्वरित बंद करून नियोजित कामे करावी. – अक्षय तायडे

सदर परिस्थिती ही सत्य असुन इथल्या नागरिकांच्या व जि.प.मराठी मुलांची शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ही आरोग्यास धोका आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. – शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष -दिलीप खैरे.