जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२५ । महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या महाराष्ट्र्रातील जनतेला महावितरणने वीजदरवाढीचा मोठा शॉक दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दरवाढ झाली. महावितरणने ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ केली असून या वाढीचा फटका घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक अशा सर्वच ग्राहकांना बसणार आहे. सणासुदीच्या खर्चावर आता या अतिरिक्त भाराची भर पडली आहे

खरंतर १ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते.मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर रोजी महावितरण विभागाने एक परिपत्रक जारी केले होते.

यात सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला, अशी माहिती महावितरणने दिली आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की, ही दरवाढ येत्या काही महिन्यांतही सुरूच राहील. महावितरणचे म्हणणे आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.
दुसरीकडे या वीज दरवाढीमुळे महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या जनतेला जबर धक्का बसला आहे. सणासुदीच्या काळात खरेदीचा आनंद हरवून आता घरगुती बजेटचा ताळमेळ बिघडला आहे. महावितरणच्या सलग दरवाढीमुळे रोष उफाळून आला असून, ही अन्याय्य वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
घरगुती ग्राहकांवर असा पडणार भार
श्रेणी ……………. प्रति युनिट – इंधन समायोजन शुल्क
बीपीएल – १५ पैसे
१ ते १०० युनिट- ३५ पैसे
१०१ ते ३०० युनिट – – ६५ पैसे
३०१ ते ५०० युनिट – ८५ पैसे
५०१ पेक्षा जास्त – ९५ पैसे









