जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । दोन दिवसापूर्वी म्हणजेच शनिवारी भुसावळ शहरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजांच्या तारासह काही ठिकाणी विजेचे पोल वाकले होते. परिणामी शनिवारी शहरातील जवळपास ८० टक्के भाग अंधाऱ्यात होता. काल रविवारी शहरातील काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र यातही काही ठिकाणी २० तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तो पुन्हा खंडित झाला आहे. दरम्यान, महावितरणकडून शहरातील ९० टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी मात्र अद्यापही काही भाग अंधाऱ्यातच आहे. त्यामुळे एकंदरीत महावितरणचा दावा फोल ठरल्याचे दिसून येतंय.
जळगाव जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. दोन दिवसापूर्वी म्हणजेच शनिवारी सायंकाळी वादळाने जोरदार तडाखा दिला होता. यात भुसावळ शहरात ७० ठिकाणी लहान-मोठी झाडे व त्यांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तसेच ८२ ठिकाणी वीज तारा पडल्या, तर ३५ हुन अधिक ठिकाणी पोल वाकले होते. परिणामी शनिवारी सायंकाळपासून भुसावळ शहरातील जवळपास ८० टक्के भाग अंधाऱ्यात होता. शनिवारपासूनच महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.
काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडथळे असतानाही महावितरण कर्मचाऱ्यांकडून(कंत्राटी कर्मचाऱ्यांसह) रविवारी शहरातील काही भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात होता. मात्र यातही काही ठिकाणी २० तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तो पुन्हा खंडित झाला आहे. यात रामदेव बाबा नगरमधील अक्सा कॉलनी परिसराचा समावेश आहे. अद्यापही त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला नाहीय. महावितरणचे शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडून शहरात ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच उर्वरित १० टक्के भागातील वीजपुरवठा आज सोमवारी सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्यापही काही भाग अंधाऱ्यात असून अजून एक दोन दिवस वीज पुरवठा होणार नसल्याचे चर्चा देखील सुरूय.
दरम्यान, आधीच पालिकेकडून शहराला १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. अशातच काही भागात अद्यापही वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. तसेच दुसरीकडे उन्हाळ्या सारखे दिवस सुरु आहेत. त्यात अद्यापावतो काही ठिकाणी वीज पुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.