अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । एक वयोवृद्धा दुचाकीने चाळीसगावाकडे येत असताना भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव शहरातील बालाजी नगर जवळ घडली आहे. कमलाकर काशीराम जंगले ( वय-६२ ) असे मृत वृद्धाचे नाव असून या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथील कमलाकर काशीराम जंगले ( वय-६२ ) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच.१५ ए.एफ. ८७५८) मालेगाव कडून चाळीसगावाकडे येत असताना अचानक अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार कमलाकर जंगले हे जागीच ठार झाले. हि घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मालेगाव – चाळीसगाव रोडवरील बालाजी नगराजवळ घडली. घटना घडताच अज्ञात वाहन धारक हा पसार झाला होता.
दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अकस्मात मृत्यूच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर मुलगा राकेश कमलाकर जंगले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा १८४,१३४(ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील हे करीत आहेत.