⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पुन्हा चर्चा : एकनाथराव खडसेंना मिळणार मंत्री पद, कही खुशी-कही गम!

जळगाव लाईव्ह न्यूज ।चेतन वाणी । राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे पुन्हा पुनर्वसन होण्याचा मार्ग पुन्हा सुकर झाला आहे. भाजपमध्ये असताना अचानक खडसेंवर अनेक आरोप झाले होते. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना ४ जून २०१६ रोजी राजीनामा द्यावा लागला होता. खडसेंकडे त्यावेळी तब्बल डझनभर खाती होती. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर खडसेंना क्लीन चीट मिळणार आणि ते पुन्हा मंत्री होणार अशी आशा सुरुवातीला होती, परंतु तसे काही झालेच नाही. भाजपात होत असलेल्या घुसमटीला कंटाळून अखेर खडसेंनी पक्षाला रामराम केला आणि मनगटावर घड्याळ बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना दिलेला शब्द सुरवातीलाच पाळला आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत खडसेंचे नाव पाठविले. दीड वर्षापासून ती यादी रखडल्याने पक्षाने पुन्हा खडसेंना नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी देत राष्ट्रवादीने त्याचा विधिमंडळातील प्रवेश निश्चित केला आहे. गेल्या ६ वर्षांचा खडसेंच्या वनवास संपून ते पुन्हा आमदार होणार आहेत. आमदारकीच्या निमित्ताने खडसेंना राष्ट्रवादीच्या गोटातून मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. खडसे मंत्री होणार या चर्चेने कुठे आनंद तर कुठे निराशा पाहायला मिळत आहे.

राज्याचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले आणि तिथूनच त्यांच्या भाजपातील कार्यकाळाला उतरती कळा लागली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव खडसे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतच गेला आणि खडसेंना एकाकी पाडण्यात आले. माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आणि त्यात काही लोकांचा हात असल्याचे खडसे वारंवार सांगत होते. भाजपात डझनभर मंत्रीपदे तर होती पण या ना त्या मार्गाने काहीतरी ससेमिरा खडसेंच्या मागे लागलेला होता. खडसे मंत्री असताना कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे ३० कोटी लाच मागितल्याचा आरोप, जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप, दाऊदसोबत संबंध असल्याचा हॅकरचा दावा आणि भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीप्रकरणी पत्नी आणि जावयावर झालेले आरोप यामुळे खडसेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. अखेर जून २०१६ मध्ये खडसेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

खडसेंच्या आरोपांची शहनिशा करण्यासाठी झोटिंग समिती स्थापन करण्यात आली. समितीने अहवाल देण्यासाठी वेळ घेतला खडसेंनी वारंवार मागणी केल्यावर एकदाचा अहवाल समोर आला आणि खडसेंना क्लीन चीट मिळाली. खडसे निर्दोष झाले तरी त्यांच्या मागील शुक्लकाष्ठ सुटले नाही किंबहुना ते त्यांना सोडूच दिले नाही. भोसरी जमीन खरेदी प्रकरणाचा डाग दूर झाला तरी खडसेंचे भाजपने पुनर्वसन केले नाही. मंत्रिपद तर दूरच पक्षाचे एखादे मोठे पद किंवा आमदारकीचे तिकीट देखील दिले नाही. उलटपक्षी खडसेंच्या कन्या ऍड.रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून भाजपने ऐनवेळी तिकीट दिले. रोहिणी खडसेंच्या पराभवासाठी देखील पक्षांतर्गतच लोकांनी प्रयत्न केले हे सर्वश्रुत आहे. खडसे आता संपले असे समजून हळूहळू अनेकांनी त्यांची साथ सोडायला सुरुवात केली. अनेक वर्ष तळमळ सोसल्यावर अखेर खडसेंनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खडसे कामाला देखील लागले. खडसे राष्ट्रवादीत आल्याने उरले, सुरले भाजपेयी देखील खडसेंना सोडून गेले. मोजकेच चेहरे खडसेंच्या सोबत आले.

हे देखील वाचा : खडसेंचे पुनर्वसन : जळगाव भाजपात आ.भोळेंचे तर शिवसेनेत महाजनांचे वर्चस्व वाढणार!

एकनाथराव खडसे सक्रिय राजकारणापासून बाजूला होत असताना भाजप नेते गिरीश महाजन यांचे वजन आणखीनच वाढले. संकटमोचक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने सर्वत्र महाजनच महाजन दिसू लागले. कार्यकर्त्यांचा जो गराडा पूर्वी खडसेंच्या मागे होता तो आता गिरीश महाजनांच्या मागे दिसत होता. खडसे आज परत येणार, उद्या येणार या केवळ चर्चाच सुरु होत्या. खडसेंच्या पडतीच्या काळात काही शेर झाले तर काही सव्वा शेर झाले. काहींनी वारंवार खडसेंना टीकेचा धनी केले. खडसे बाजूला असताना कधी नव्हे ती भाजपने जळगाव मनपावर सत्ता प्रस्थापित केली. खडसेंच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला. जावई कोठडीत तर पत्नी चौकशीच्या फेऱ्यात अडकली. मालमत्ता खाली करण्याची नोटीस येऊन पोहचली. नाथयुग आता पुन्हा येणार नाही असे वाटत असतांनाच जळगाव मनपातील भाजपची सत्ता गेली. ईडीने दिलेल्या नोटीसला स्थगिती मिळाली. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. विधानपरिषदेवर खडसे आमदार म्हणून निवडून येणार हे निश्चित झाले.

खडसे विधानमंडळात पोहचल्यावर मंत्रीपद त्यांना जवळपास निश्चितच आहे. एकनाथराव खडसे मंत्री होणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. खडसेंच्या दारी पुन्हा लाल दिव्याची गाडी येणार याच चर्चेने अनेकांचे आतापासूनच इंडिकेटर लागले आहे. अर्धा तप बाजूला राहिल्याने खडसेंनी लोकांना जवळून अनुभवले आहे. आजवरच्या राजकारणात भेटलेल्या सर्वांचीच कुंडली खडसेंच्या हाती असल्याने काहींच्या मनात धाकधूक आहे. आपण खडसेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची जाणीव आता होऊ लागल्याने कुठे नाराजीचे वातावरण आहे. खडसे पुन्हा परतणार असल्याने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कधी महाजनांच्या मागे असलेला कार्यकर्त्यांचा गराडा पुन्हा एकदा खडसेंच्या मागे दिसू लागला आहे. आमदारकीचा अर्ज भरतानाच हे वातावरण आहे तर खडसे मंत्री झाल्यावर आणखी काय वातावरण असेल याची चिंता विरोधकांना लागून आहे. खडसे परतल्यानंतर आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद, जळगाव जिल्हा दूध संघ, जळगाव मनपा, विधान परिषद निवडणुकीत काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळेल यात शंका नाही.

एकनाथराव खडसेंचा संक्षिप्त जीवन परिचय

  • एकनाथराव खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावी २ सप्टेंबर १९५२ रोजी जन्म झाला.
  • खडसेंचे वडील शेतकरी होते. कोथळी गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.
  • सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच खडसे राजकारणात सक्रीय होते.
  • १९८७ मध्ये खडसे कोथळी गावचे सरपंच म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
  • १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
  • सलग सहा वेळा खडसे मुक्ताईनगरातून विधानसभेवर निवडून गेले.
  • १९९५ मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम पहिले.
  • २००९ मध्ये युती सरकार विरोधात गेल्यावर खडसेंनी विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले.
  • २०१४ ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
  • मुख्यमंत्री पद न मिळाले नसले तरी खडसेंकडे १२ मंत्रीपदाची जबाबदारी होती.
  • आरोप झाल्याने जून २०१६ मध्ये खडसेंना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना भाजपने तिकीट नाकारले.
  • ८ मे २०२० रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत देखील खडसेंना उमेदवारी देण्यात आली नाही.
  • २१ ऑक्टोबर २०२० रोजी खडसेंनी भाजप सोडली.
  • २३ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.