अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली ‘ही’ मागणी?

सप्टेंबर 19, 2025 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे नाल्यांचे पाणी थेट शेतात शिरल्याने पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची मदत वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी शेतकरी व पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी धान्य, कपडे, औषधे, चारा आणि तात्पुरते निवारा केंद्र उपलब्ध करण्याकडेही लक्ष वेधले आहे.

khadse fadanvis

राज्यात सध्या मान्सून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून याच दरम्यान मागच्या काही दिवसापूर्वी जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. ज्यामुळे शेतात पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेले. याशिवाय शेकोडो जनावरे दगावली असून, गोठे व चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही नागरिक बेपत्ता झाल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही स्थिती लक्षात घेता आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारकडे तातडीने वाढीव मदतीची मागणी केली आहे.

नुकसानग्रस्त भागात पंचनामे करताना सध्याचा ३३ टक्के पीक नुकसानीचा निकष लावू नये. कारण, शेतकऱ्यांचे अतोनात झालेले आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट त्यांच्या पूर्ण क्षेत्रावर नुकसानभरपाई देण्यात यावी. ही भरपाई जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत दिली जावी, असेही खडसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे

नुकसानीचे प्रमाण लक्षात घेता पुन्हा जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आमदार खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सद्यःस्थितीत महसूल आणि वन विभाग यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपत्ती निवारणासंदर्भातील शासन निर्णयातील तरतुदी अपुऱ्या ठरत आहेत. त्यामध्ये तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. एक जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध शासन निर्णयानुसार पिकांच्या नुकसानीची मदत रक्कम वाढवून कोरडवाहू शेती पिकांसाठी १३ हजार ६०० रूपये प्रति हेक्टरी (तीन हेक्टरपर्यंत), बागायती पिकांसाठी २७ हजार रूपये प्रति हेक्टरी (तीन हेक्टरपर्यंत) आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रूपये प्रति हेक्टरी (तीन हेक्टरपर्यंत) निश्चित करण्यात आली होती. परंतु, ३० मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार आता कोरडवाहू शेती पिकांसाठी ८,५०० रूपये प्रति हेक्टरी (दोन हेक्टरपर्यंत), बागायती पिकांसाठी १७ हजार रूपये प्रति हेक्टरी (दोन हेक्टरपर्यंत) आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रूपये प्रति हेक्टरी (दोन हेक्टरपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now