जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. मात्र यातच शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केलीय. मुक्ताईनगरच्या निवडणुकीतून खडसेंनी माघार घेतली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर तालुका हा एकनाथ खडसे यांचा बालेकिला मानला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला अनेक हादरे दिले आहेत. खडसेंच्या समर्थकांचे आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळे सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता खडसे यांनी मोठं विधान केलं आहे.

खडसे यांनी म्हटले की, “मुक्ताईनगर शहरात आमचे कार्यकर्ते पूर्वीपासूनच कमजोर आहेत. पंचायत समिती निवडणुकीतही आम्ही केवळ चार ते पाच अशाच जिंकण्यासारख्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करत आहोत. आवश्यकता भासली तर त्या जागाही आम्ही लढवणार नाही,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.खडसे यांच्या या वक्तव्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट स्पर्धेतून बाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खडसेंचा हा ‘संकेत’ उघडपणे कबुलीच्या रूपात समोर आल्यानंतर मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.










