जळगाव जिल्हाराजकारण

अपघाताने आमदार झालेल्यांनी… ड्रोनच्या रेकीवरून खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा

जळगाव लाईव्ह न्यूज । माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊससह हतनूर धरण आणि वरणगाव येथील संवेदनशील डिफेन्स फॅक्टरी परिसरात संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या प्रकाराने जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि सुरक्षा विषयक वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून आमदार एकनाथ खडसे यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत पोलिसांच्या भूमिकेसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. दरम्यान, हतनूर धरण प्रशासनाने या प्रकाराबाबत गेल्याच महिन्यात सावदा आणि वरणगाव पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे.

खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोडसगाव, सावदा, निमखेडी मार्गे हतनूर धरण आणि त्यानंतर वरणगाव येथील डिफेन्स फॅक्टरीच्या दिशेने संशयित ड्रोनच्या फेऱ्या होत असल्याचे नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. रात्री उशिरापर्यंत या ड्रोनच्या हालचाली पाहण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

या प्रकाराबाबत सत्ताधारी नेत्यांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप खडसे यांनी केला. जिल्ह्याच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील विषयाची खिल्ली उडविण्याऐवजी त्याची गंभीर दखल घेऊन तपास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी या अतिसंवेदनशील विषयावर निव्वळ टिंगल उडवणे योग्य नाही. सुरक्षेचे गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांमुळे जिल्ह्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच, “अपघाताने आमदार झालेल्यांनी ४५ वर्षे राजकारण करणाऱ्या खडसेंना प्रसिद्धीचे धडे देऊ नयेत,” अशा शब्दांत त्यांनी कडक शब्दांत सुनावले.

हतनूर धरण हे मोठे जलसाठा प्रकल्प असून वरणगाव येथील डिफेन्स फॅक्टरी परिसरही सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या परिसरात वारंवार संशयित ड्रोनच्या हालचाली होत असल्यास त्यामागील नेमके कारण काय, ड्रोन कोणाचे आहे आणि त्याच्या हालचालींचा उद्देश काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सामान्य नागरिक आणि धरण प्रशासनाच्या निदर्शनास येणाऱ्या या हालचालींची पोलिसांकडून कितपत दखल घेतली जात आहे, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ड्रोनच्या हालचालींमागील नेमके कारण शोधावे, तसेच सुरक्षा यंत्रणांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button