जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सावदा पोलीस प्रशासनावर आणि सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आणि आरोप केले आहेत. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ खडसे म्हणाले की, सावदा परिसरातील एका मोठ्या गावातील विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. तोही एका राजकीय पदाधिकाऱ्यानं केला आहे. ती महिला तक्रार द्यायला सावदा पोलीस ठाण्यात आली होती. ती सकाळी १२ ते ७ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबली होती. तरीही तिची तक्रार घेतली नाही. तो पदाधिकारी मोठा राजकीय पदाधिकारी आहे. महिला विधवा आहे. तिची नोंद न घेणं, हा गंभीर गुन्हा आहे. तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी संबंधित पोलीस निरीक्षकाने तिला धमकावून माघारी पाठवलं. ही सगळी घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे मी फुटेजची मागणी केली आहे. अजून फुटेज मिळाले नाहीत. पण ही माझी माहिती आहे. सात-सात तास पोलीस ठाण्यात ताटकळूनही बलात्कार पीडितेला न्याय मिळत नसेल तर ही गंभीर बाब आहे.

एका मोठ्या पदाधिकाऱ्याविरोधात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा असूनही पोलिसांनी दखल घेतली नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे,असे ते म्हणाले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा दावा करत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा पोलीस अधिकाऱ्याचा फोटो प्रसारमाध्यमांना दाखवला. अधिकारी मंत्र्यांसोबतचे फोटो स्टेटसला ठेवतात आणि त्यातून त्यांना संरक्षण मिळते,असा आरोप त्यांनी केला.

तसेच संबंधित पोलीस निरीक्षक केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत असल्याचा गंभीर आरोपही खडसे यांनी केला आहे. या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.









