Big Breaking : एकनाथराव खडसेंना पुन्हा मिळणार ‘लाल दिवा’!
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । राज्यात नुकतेच सत्तांतर झाले असून उद्धव ठाकरे पायउतार होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसल्याने आता विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी एकनाथराव खडसेंवर सोपविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्त वहिनीने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.
राज्यात असलेल्या महाआघाडी सरकार विरोधात बंड पुकारून शिवसेनेचे ४० आमदार बाहेर पडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने नवीन सरकार स्थापन केले. भाजप हाय कमांडच्या आदेशाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सरकार स्थापनेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळ बाहेर राहणार असल्याचे म्हटले होते परंतु नंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर विरोधात असलेल्या भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस भूमिका बजावत होते.
राज्यात नवीन सरकार आले असून रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाळी अधिवेशनाला सोमवार दि.१८ रोजी सुरुवात होणार आहे. राज्याचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे नुकतेच विधान परिषद निवडणूक लढवून पुन्हा विधानमंडळात पोहचले आहेत. खडसेंचे पुनरागमन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत झाली असली तरी सध्या विरोधी पक्षात बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विधान मंडळात पक्षाचा बुलंद आवाज हवा आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायला अनुभवी सदस्य हवा म्हणून एकनाथराव खडसे यांना विरोधी पक्षनेते करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे सध्या काही नावे पोहचली असून त्यात एकनाथराव खडसेंचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. एकनाथराव खडसेंना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केल्यास मुक्ताईनगरला पुन्हा लाल दिवा मिळणार आहे. खडसेंच्या दारी लाल दिवा आला म्हणजे ‘पंगतीला बसलो आणि बुंदी संपली’ म्हणणाऱ्यांच्या तोंडावर ही जोरदार चपराक असेल. बुंदी संपली म्हणून तर गुलाबजाम मिळाला, असा टोला खडसेंनी तेव्हा लगावला तर नवल नको वाटायला.