हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून खडसे शिंदे-फडणवीस सरकारवर बरसले, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं. हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकोमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हिवाळी अधिवेशनात माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाही असा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये मुख्यमंत्रीही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला असं स्पष्ट बोलत खडसे यांनी हिवाळी अधिवेशनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

विदर्भात अधिवेशन असताना विदर्भाच्या प्रश्नाला न्याय नाही असा थेट आरोप करत एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादकांच्या अडचणीवर भाष्य केलं आहे. कापूस उत्पादकांच्या मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. 14 हजाराहून 6000 कापसाचा भाव गेला आहे त्यावर कुणीही बोलत नाही म्हणत खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या कोणत्याच प्रश्नाला या ठिकाणी विचारले गेले नाही, गंभीर प्रश्न बाबत सरकार हे असंवेदनशील आहे असा आरोप खडसे यांनी केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणावरून निशाणा
दरम्यान दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंग प्रकरणात देखील काही प्रश्न उपस्थित केले होते. फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र या क्लोजर रिपोर्टमध्ये काही त्रुटी असल्याचं म्हणत न्यायालयानं हा रिपोर्ट अमान्य केला. तसेच या प्रकरणात पुन्हा तपास करून नव्याने रिपोर्ट सादर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. यावरून खडसे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांच्या पाठिमागे कोण होते आणि फोन टॅपिंगमागे काय हेतू होता हे समोर आलं पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.