⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

एकच साहेब बाबासाहेब..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती म्हणजे एक उत्सवच असतो. गेल्या दोन वर्षपासून असलेली कोरोनाची मरगळ झटकत यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात होणार यात तिळमात्र शंका नाही. जयंती उत्सवनिमित्त गेल्या पंधरा दिवसापासून तयारी सुरु झाली आहे. निळे झेंडे, विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने, पुतळ्याची स्वच्छता, फलक हे सर्वत्र पहावयास मिळत आहे. नेहमीपेक्षा यंदाची जयंती काही खास आहे. जळगाव शहरात लावण्यात आलेल्या बहुतांश बॅनरवर कुणाचेही फोटो नसून केवळ डॉ.बाबासाहेबांचाच फोटो आहे. बाबासाहेब हेच सर्वश्रेष्ठ असून आमच्या दैवतसोबत आमचा फोटो शोभुच शकत नाही, असा संदेश त्यातून देण्यात आला आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे १४ एप्रिल. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जयंती उत्सव साजरा करण्यास परवानगीच नव्हती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला देशभर एक उत्सव साजरा केला जातो. कोरोनाची मरगळ दूर झाल्याने यंदा जयंती जल्लोषात साजरी होणार आहे. शासनाने कोणतेही निर्बंध लादलेले नसल्याने दिवस रात्र उत्सव साजरा होईल.

जळगाव जिल्ह्यात बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी पंधरा दिवसापासूनच सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले. डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमा, झेंडे, विविध वॉलपेपरचे फोटो विक्रीची दुकाने अनेक ठिकाणी थाटण्यात आली. गावभर निळे झेंडे लावण्यात आले. जयंती उत्सव समित्यांची स्थापना होऊन जबाबदारीचे वाटप झाले. शहरात काही दिवसापासून ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात येत आहे. काही चौकात ते मोठे होर्डिंग्स देखील लावलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वश्रेष्ठ असून त्यांची बरोबरी कधीच कुणीच करू शकत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गेल्या वर्षी सांगलीत एक कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला होता, तो म्हणजे शुभेच्छा फलकावर बाबासाहेबांशिवाय कुणाचाही फोटो नसावा. जळगावात देखील बहुतांश ग्रुप, संस्था, संघटनांनी हाच पॅटर्न अवलंबला आहे. शहरात लावण्यात आलेल्या अनेक बॅनरवर केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो असून खाली केवळ शुभेच्छुकांचे आणि संघटनांचे नाव आहे. जळगावात राबविण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. एखाद्या बॅनरवर केवळ डॉ.बाबासाहेबांचाच फोटो असल्यास ते बॅनर देखील लक्षवेधी वाटते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, विविध ग्रुप, संघटना यांचे विशेषतः फलक लक्षवेधी ठरले. काहींनी अद्यापही बाबासाहेबांसोबत आपले फोटो फलकावर लावले असून त्यांनी इतरांकडून बोध घेणे आवश्यक आहे. समाजाला आणि देशाला एक योग्य दिशा देण्याचे कार्य डॉ.बाबासाहेबांनी केले असून त्याच विचारांवर सर्वांनी पुढे गेल्यास खरोखर सर्वांसाठी अभिमानास्पद बाब ठरेल.