जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ । सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेतेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केले आहे. अशा स्थितीत आगामी काळात खाद्यतेलाच्या दरात घसरण होऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून महागाईत मोठी वाढ झाल्याने देशातील जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहेत. त्यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.
आता आयात शुल्क किती आहे?
भारत सामान्यतः रिफाइन्डऐवजी ‘कच्च्या’ सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात करतो. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. या कपातीमुळे रिफाइंड खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क 12.5 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात समाजकल्याण उपकराचाही समावेश आहे. सर्व प्रमुख कच्च्या खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क 5.5 टक्के आहे.
सुधारित आयात शुल्क 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.