खाद्यतेलाच्या दरात उसळी, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले ; आता युद्धविरामानंतर मिळणार दिलासा?

एप्रिल 8, 2026 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट स्वयंपाकघरातील बजेटवर जाणवली आहे. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. विशेषतः सोयाबीन तेलाच्या दरात अचानक उसळी दिसून आली असून प्रति किलो सुमारे ३५ रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी १२५ ते १३५ रुपयांदरम्यान मिळणारे सोयाबीन तेल आता १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

oil 2

याशिवाय शेंगदाणा, सूर्यफूल आणि पामतेलाच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. कच्चे तेल आणि खाद्यतेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने उत्पादन व वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम थेट बाजारातील किमतींवर होत आहे.

दरम्यान आता अमेरिका आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर बाजारात सकारात्मक संकेत दिसू लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील तणाव कमी झाल्यास खाद्यतेलाच्या किमतींमध्ये लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे.

युद्धामुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते, तसेच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने उत्पादन आणि वाहतूक खर्चही वाढला होता. त्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, पाम आणि शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता परिस्थिती हळूहळू स्थिर होत असल्याने पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, जर युद्धविराम कायम राहिला आणि कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी झाल्या, तर येत्या काही आठवड्यांत खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट दिसू शकते. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खाद्यतेलाचे जुने व सध्याचे दर (प्रति किलो)

  • सोयाबीन तेल: १२५ ते १३५ रुपये → १६० ते १७० रुपये
  • सूर्यफूल तेल: १३५ ते १४५ रुपये → १७५ ते १९० रुपये
  • शेंगदाणा तेल: १७० ते १७५ रुपये → १८५ ते १९० रुपये
  • पाम तेल: १३० ते १४० रुपये → १६५ ते १७५ रुपये

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now