सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; खाद्यतेलाच्या किमती घसरल्या, वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । सध्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघतेय. दिवाळीच्या आधीपासूनच तेलाच्या दरात वाढ सुरू होती. मात्र आता ते पहिल्यांदाच घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन तेलाचे 900 MLचे पाऊच 14 रुपयांनी स्वस्त झाले. तर 15 किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर 250 ते 270 रुपयांनी खाली आले.

हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी खाद्य तेलाचे भाव घसरले होते. मात्र ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे भाव वधारले होते. यामुळे स्वयंपाकघराचे बजेटच ढेपाळले होते. जळगाव स्थानिक बाजारात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत 120 ते 123 रुपयापर्यंत होते. तर खुले एक किलो तेलाचा दर जवळपास 126 ते 130 रुपये इतके होते. परंतु दसऱ्यानंतर खाद्यतेलाच्या वाढ होताना दिसून आली.

गेल्या काही दिवसापूर्वीच सोयाबीन तेलाचे 900 MLचे पाऊच 145 रुपयापर्यंत गेले होते. मात्र आता झालेल्या घसरणीनंतर तेलाचे 900 MLचे पाऊच 127 ते 129 रुपयांवर आले आहे. तर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत 15 किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर 2400 रुपयापर्यंत गेले होते. ते मंगळवारी 250 रुपयांनी कमी होऊन 2150 रुपयापर्यंत खाली आले.

घाऊक बाजारातील पामतेल घसरले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाचे दर घसरल्याने देशातील घाऊक बाजारपेठेत गेल्या आठवड्यात ११० रुपये प्रति किलो मिळणारे पामतेल सोमवारी ९८ रुपयांपर्यंत खाली आले. त्याचा परिणाम मंगळवारी सोयाबीन तेलाचे दर घसरण्यावर झाला.