⁠ 
बुधवार, मे 1, 2024

राजमल लखीचंद ज्वेलर्सची तब्बल ‘इतक्या’ लाखांची रोकड ‘ईडी’ने घेतली ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कोट्यवधींच्या कर्ज प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात, ‘ईडी’ने सलग दोन दिवस राजमल लखीचंद ज्वेलर्स व अन्य आस्थापनांवर छापे टाकले. तपासणीनंतर संचालक, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांना समन्स बजावले आहे. ईश्‍वरलाल जैन यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

‘ईडी’च्या या छापेमारीत ज्वेलर्समधील सर्व दागिन्यांचा साठा तसेच जवळपास ९० लाखांची रोकड ताब्यात (सिज) घेतल्याचे सांगितले जात आहे. जैन पिता-पुत्रांनी या कारवाईविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरविले आहे.

राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांत सुमारे ५०० कोटींहून अधिक कर्ज घेतले होते. चार टक्के व्याजाने घेतलेल्या या कर्जाला बँकेने वसूल करताना नियमबाह्यपणे व्याजदर वाढवून, अतिरिक्त कर लावून थकबाकीची रक्कम वाढवून दिल्याचा दावा ईश्‍वरलाल जैन यांच्याकडून केला जात आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे.