खडसेंच्या अडचणीत वाढ ; ईडीकडून एक हजार पानी आरोपपत्र दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
गिरीश चौधरी यांनी या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. काल विशेष पीएमएलए कोर्टानं गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. गेल्या आठवड्यात ईडीनं एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली. एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 4 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँकेतील 86 लाख 28 हजार रुपये असा या कारवाईचा तपशील आहे.
नक्की काय आहे प्रकरण-
भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता