जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२५ । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७० ई-बसेसमधील पहिल्या टप्यातील १३ बसेसचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. यामध्ये नऊ मीटरच्या पाच आणि बारा मीटरच्या आठ बसेसचा समावेश आहे. एसटी महामंडळाकडून या बसेस कोणत्या मार्गावर धावणार आणि वेळापत्रकासह भाडे निश्चित केले आहे.

जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा उपलब्ध करून देतील. इंधन बचतीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वातानुकूलित, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

दरम्यान, या सर्व बसेस आता जळगाव शहरातून बीड, नाशिक, धुळे, रावेर, चाळीसगावसह आठ प्रमुख मार्गावर शनिवारपासून धावणार आहे. एसटी महामंडळाकडून वेळापत्रकासह भाडे निश्चित केले असून साध्या बसपेक्षा या बसचे भाडे साधारणपणे दीडपट जास्त राहणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना या बसेसमध्ये सवलत मिळणार आहे.
दृष्टीक्षेपात- ई-बसची वैशिष्ट्ये
सदर ई – बसेस पर्यावरणपूरक असून धूर व आवाज प्रदूषण शून्य आहेत. या बसेस बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने इंधनाची मोठी बचत होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना थंडगार व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार असून, पुशबॅक सीट व मोबाईल चार्जिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या 13 बसेसमध्ये 12 मीटर लांबीच्या 8 व 9 मीटर लांबीच्या 5 वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. 9 मीटर बस दर प्रति टप्पा ₹13.80 तर 12 मीटर बस दर प्रति टप्पा ₹15.15 असा ठेवण्यात आला असून, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील दर आहेत. या बसेस जळगाव जिल्ह्यातील तालुका-ते-तालुका सेवेसह चाळीसगाव, जामनेर, शिरपूर, चोपडा तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिक या मार्गांवर धावणार आहेत
कोणत्या मार्गावर धावणार अन् किती असेल भाडे?
जळगाव ते बीड….. ई-बस- (एसी)- ७६३… साधी एसटी -४८३
जळगाव ते नाशिक….. ई-बस- (एसी)- ६८३… साधी एसटी – ४३३
जळगाव ते शिरपूर….. ई-बस- (एसी)- ३०२… साधी एसटी -१९२
जळगाव ते धुळे….. ई-बस- (एसी)- २५५… साधी एसटी -१५२
जळगाव ते रावेर….. ई-बस- (एसी)- २०७… साधी एसटी – १३२
जळगाव ते जामनेर….. ई-बस- (एसी)- ११२… साधी एसटी – ७१
जळगाव ते चाळीसगाव….. ई-बस- (एसी)- २४७… साधी एसटी – १७२
जळगाव ते संभाजीनगर….. ई-बस- (एसी)- ४०६… साधी एसटी – २८२









