जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात नाकाबंदी दरम्यान, भरारी पथकाने कारमधून ६३,६८,९४८ रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईने पुन्हा खळबळ उडाली असून जळगाव शहर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी ही माहिती दिली.
याबाबत असे की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्हाभरात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. यातच तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान कारमधून सुमारे दोन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता आकाशवाणी चौकात कारमधून लाखोंची रोकड जप्त केली.
भरारी पथकाला संशयित कारबाबत भ्रमणध्वनीवरून माहिती प्राप्त झाली होती. आकाशवाणी चौकात कार (एमएच १९, ईए ९१७३) तपासणी केली. त्यात राकेश ए. जैन (नयनतारा अपार्टमेंट कलाभवन समोर, सिंधी कॉलनी रस्ता) यांच्याकडे ६३ लाखांवर रोख रक्कम आढळली. या रकमेबाबत इएसएमएस प्रणालीनुसार जिल्हा तक्रार निवारण समितीसमोर पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम लोखंडी पेटीत सीलबंद करून कोषागारात जमा करण्यात आली. संबंधितांना या प्रकरणी आयकर विभागाकडून नोटीस देण्यात येणार आहे. त्यांना रकमेबाबत हिशेब द्यावा लागेल, अशी माहिती निवडणूक विभागाच्या माध्यमातून देण्यात आली.