जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा कहर सुरू असून अलीकडे जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतुक प्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर धडक कारवाया करण्यात आल्या. असे असतानाही काही ठिकाणी अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. अशातच भडगाव येथून डंपरद्वारे चाळीसगाव येथे वाळू वाहतूक होत असल्याचा प्रकार चाळीसगाव शहर पोलिसांनी उघडकीस आणला.

पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीची ५ ब्रास वाळू व २२ लाख रूपये किमतीचा डंपर असा सुमारे २२ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी डंपर चालक व मालक अशा दोघांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक योगेश माळी, चालक हवालदार नितीन पाटील, हवालदार गोपाल पाटील असे शुक्रवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना ओझर गावाजवळ भडगावकडून चाळीसगावकडे डंपर ( क्रमांक एमएच.१९ सीवाय ८९०९) जोरात येतांना दिसले. डंपरमधून पाणी गळत होते. पोलिसांनी डंपरचालकास थांबण्यास सांगितले असता डंपर चालकाने तेथून पळ काढला, या डंपरचा नंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच पकडले. डंपरची पाहणी केली असता त्यात वाळू मिळून आली.
पोलिसांनी डंपर चालक प्रदीप भाऊसाहेब साळुंखे रा. भडगाव याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे काय अशी विचारणा केली असता त्याने कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी वाळूसह हा डंपर जप्त करून पोलीस कवायत मैदानावर आणला. पोलिसांनी डंपर चालकाकडे डंपर मालकाबाबत विचारणा केली असता हा डंपर लखीचंद प्रकाश पाटील (रा. वडदे ता. भडगाव) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी डंपर व त्यातील पाच ब्रास वाळू असा सुमारे २२ लाख ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून डंपर चालक प्रदीप साळुंखे व मालक लखीचंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.