शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे मनपाचे ७ कोटी २० लाखांची होणार बचत
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । राज्य शासनाकडून महापालिकेतील शिक्षकांचा पुर्ण पगार दिला जाणार आहे. यासाठी शासनाने महानगरपालिका व नगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची माहिती मागविली आहे.
शासनाने नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचे १०० टक्के वेतन अदा केल्यास जळगाव महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांवरील दर वर्षीचा ७ कोटी २० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना ५० टक्के वेतन राज्यशासनाकडून तर ५० टक्के वेतन महापालिकेकडून अदा केले जाते. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनावर महापालिकेकडून दर महिन्याला ६० लाख रुपयांचा खर्च होत आहे. राज्यशासनाने या शिक्षकांचे १०० टक्के वेतन अदा करण्याची जबाबदारी घेतल्या महानगरपालिकेचे दर वर्षी ७ कोटी २० लाख रुपयांची बचत होणार आहे. शासनाने दि.१३ रोजी मनपा आयुक्त यांना पत्र देवून आपल्याकडील शिक्षकांची माहिती मागविली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत खुशखबर मिळेल, अशी आश्या मनपा प्रशासनाला आहे.
महानगरपालिकेचा आस्थापना खर्च हा ३५ टक्के पर्यंत पाहिजे असतांना सदर खर्च हा ४५ टक्क्यांपेक्षा जात होत आहे. त्यामुळे विकास कामांवर त्याचा परिणाम होतांना दिसत आहे. मनपाचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्यामुळे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांची इच्छा असतांना देखील शहरातील नागरिकांना पुरेश्या प्रमाणात सोई सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. मात्र, शिक्षकांच्या वेतनावरील भार शासनाने घेतल्यास तेव्हढा निधी नागरिकांच्या सोईसुविधांवर खर्च करता येणार आहे.