जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । यंदा मार्च महिन्यातच देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर एप्रिल महिन्यात त्यात वाढ होऊन तो ४६ अंशावर गेला. यंदा मे महिन्यात राहणारी उन्हाची तीव्रता एप्रिल (April) महिन्यातच दिसून आली. इतकंच नाही तर यंदा राज्यात वाढत असलेल्या उष्णतेच्या तडाख्यामुळे आत्तापर्यंत २५ जणांना जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगावातील ४ जणांचा समावेश आहे.
यंदा उष्माघातानं मृत्यू झाल्याची ही गेल्या सहा वर्षांमधील सर्वाधिक आकडेवारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये वाढत्या उन्हाचा त्रास झाल्यानं ३७४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं सर्वाधिक उष्ण असा मे महिना कसा जाणार, याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे. परंतु हवामान विभागाने एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात तापमान कमी राहाण्याचा अंदाज वर्तविला असून मे महिन्यात तब्बल 109 टक्के अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये एकच महिन्यात दोन ते दिन वेळा उष्णेतेची लाट येऊन गेली. गेल्या शुक्रवारी भुसावळ सह जळगावच्या तापमानाची नोंद ४६.४ इतकी करण्यात आली आहे. हे यंदाची सर्वाधिक नोंद झाली आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा कमालीचा वाढत असल्याने कडक उन्हात घामाच्या धारा वाहत आहेत. सकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ दिसत असली तरी दुपारी मात्र रस्त्यावर अघोषित कर्फ्यु लागल्याचं चित्र पाहायला मिळते. रस्त्यावर शुकशुकाट असतो.
दरम्यान, वाढत्या तापमानाने यंदा राज्यातील उष्माघाताचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले आहेत. विदर्भात १५, मराठवाड्यात ६ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्र शासीत प्रदेशांना याविषयी एक पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यांच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असे भूषण या पत्रात म्हणतात.
मात्र, दुसरीकडे हवामान विभागाने एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात तापमान कमी राहाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मे महिन्यात तब्बल 109 टक्के अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडल्यास वातावरण थंड होऊन नागरिकांचा तापमानापासून बचाव होऊ शकतो. सध्या राज्यात तापमानाने कहर केला असून, अनेक जिल्ह्यात पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.